NASA Artemis Moon Mission : यूएस स्पेस एजन्सी 'नासा' (NASA) मून मिशन 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या लॉंच केले आहे. हे प्रक्षेपण आज फ्लोरिडा (Florida) येथील केनेडी स्पेस सेंटरवरून करण्यात आले आहे. नासाचा हा तिसरा प्रयत्न आहे.आर्टेमिस-1 ही मोहीम नासाच्या मंगळ मोहिमेनंतरची सर्वात महत्त्वाची मोहीम आहे. नासा या मिशनच्या माध्यमातून ओरियन अंतराळयान चंद्रावर पाठवत आहे. हे यान 42 दिवसांत चंद्रावर प्रवास केल्यानंतर परत येईल. अमेरिकेच्या 50 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.


मंगळाचाही करता येईल प्रवास


आर्टेमिस-1 मोहिमेदरम्यान, ओरियन आणि एसएलएस रॉकेट चंद्रावर पोहोचेल आणि 42 दिवसांत पृथ्वीवर परत येईल. जर हे मिशन यशस्वी झाले तर, 2025 पर्यंत अंतराळवीर चंद्रावर पाठवले जातील. आर्टेमिस-1 मोहिमेनंतरच नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावर पोहोचण्यासाठी इतर आवश्यक तंत्रे विकसित करतील. जेणेकरून चंद्राच्या पलीकडे जाऊन मंगळाचा प्रवासही करता येईल.


 






नासाची आर्टेमिस-1 मून मिशन काय आहे?


अमेरिका आपल्या मून मिशन आर्टेमिसच्या माध्यमातून तब्बल 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहेत. आर्टेमिस-1 हे या दिशेने पहिले पाऊल आहे. ओरियन अंतराळयान मानवाच्या अंतराळ प्रवासासाठी बनवण्यात आले आहे. हे यान प्रथम पृथ्वीपासून चंद्रापर्यंत 4.50 लाख किमी प्रवास करेल. एवढा लांब प्रवास करणारे ओरियन अंतराळयान हे पहिले अंतराळयान असेल. दरम्यान, मुख्य मून मिशनसाठी हे एक चाचणी उड्डाण आहे, ज्यामध्ये एकही अंतराळवीर पाठवला जाणार नाही. या उड्डाणामुळे चंद्राभोवतीची परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही? हे जाणून घेण्याचे शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे. तसेच, चंद्रावर गेल्यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत येऊ शकतील का? हे देखील पाहण्यात येईल


42 दिवस, 3 तास आणि 20 मिनिटांचे मिशन 
नासाची 'स्पेस लॉन्च सिस्टम (एसएलएस) मेगारॉकेट' आणि 'ओरियन क्रू कॅप्सूल' चंद्रावर पोहोचतील. अंतराळवीर सहसा क्रू कॅप्सूलमध्ये राहतात, परंतु यावेळी ते रिक्त असेल. हे मिशन 42 दिवस, 3 तास आणि 20 मिनिटांचे आहे, त्यानंतर ते पृथ्वीवर परत येईल. हे यान एकूण 20 लाख 92 हजार 147 किलोमीटर अंतर कापणार आहे.


 हे मिशन अनेकदा अयशस्वी झाले आहे
काही दिवसांपूर्वीच नासाला आपले बहुप्रतिक्षित मिशन आर्टेमिस-1 मागे घ्यावे लागले होते. नासाने हे मिशन पुढे ढकलून ते व्हेईकल असेंबली बिल्डिंग (VAB) मध्ये परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता.


आर्टेमिस मिशन काय आहे? 
कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ जॅक बर्न्स म्हणाले की, आर्टेमिस-1 रॉकेट 'हेवी लिफ्ट' आहे आणि त्यात आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली इंजिने आहेत. हे रॉकेट चंद्राच्या कक्षेत जाईल, आणि काही छोटे सॅटेलाईट सोडेल आणि नंतर स्वतःच कक्षेत स्थापित होईल.


आर्टेमिस-2 कधी होणार लाँच?
नासाच्या माहितीनुसार, 2024 च्या आसपास आर्टेमिस-2 लाँच करण्याची योजना आहे. यात काही अंतराळवीरही जातील, पण ते चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत. या मोहिमेचा कालावधी मोठा असला तरी, सध्या, अंतराळवीरांची यादी समोर आलेली नाही. यानंतर, अंतिम मिशन आर्टेमिस-3 रवाना केले जाईल. त्यात जाणारे अंतराळवीर चंद्रावर उतरतील. हे मिशन 2025 किंवा 2026 च्या आसपास सुरू केले जाऊ शकते. ह्युमन मून या मिशनमध्ये पहिल्यांदाच महिलाही सहभागी होणार आहेत. बर्न्सच्या मते, या मिशनच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेले पाणी आणि बर्फ यावर संशोधन करतील.


आर्टेमिस मिशनची किंमत किती?
नासाच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी $93 बिलीयन (7,434 अब्ज रुपये) खर्च येईल. त्याच वेळी, प्रत्येक फ्लाइटची किंमत 4.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 327 अब्ज रुपये असेल. या प्रकल्पावर आतापर्यंत 37 बिलीयन डॉलर्स म्हणजेच 2,949 अब्ज रुपये खर्च झाले आहेत.


नासाच्या मीडिया प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम
आर्टेमिस मिशनचे प्रक्षेपण NASA च्या मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील लाइव्ह-स्ट्रीम केले जाते. NASA टेलिव्हिजन, एजन्सीची वेबसाइट, NASA अॅप आणि त्याचे सोशल मीडिया Twitter, Facebook, LinkedIn वरही दाखवण्यात येते