विंडहोक: नामिबिया देशात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे येथील सरकारने तब्बल 723 वन्यप्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. नामिबियात सध्या यंदाच्या शतकातील सर्वात मोठा दुष्काळ (Drought) पडला आहे. त्यामुळे देशात नागरिकांना खाण्यासाठी फारसे अन्नधान्य उरलेले नाही. त्यामुळे येथील सरकारने (Namibia) देशातील 14 कोटी नागरिकांना मांस पुरवण्यासाठी हत्ती (Elephants), पाणघोडे यांच्यासह 723 वन्यजीवांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कत्तल करण्यात येणाऱ्या प्राण्यांमध्ये 30 पाणघोडे, 60 म्हशी, 50 इम्पाला, 100 रानगवे, 300 झेब्रा (Zebra), 83 हत्ती आणि 100 वनगायींचा समावेश आहे. आतापर्यंत सरकारने 150 वन्यप्राण्यांची (Wild Animals) कत्तल केली आहे. यामधून नागरिकांना खाण्यासाठी 63 टन मांस उपलब्ध झाले आहे.
या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना नामिबियाच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, मांसासाठी प्राण्यांची कत्तल करणे आवश्यक आहे. हे आमच्या संविधानाला धरुन आहे. संविधानानुसार नामिबियातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर नागरिकांचा प्रथम हक्क आहे.
नामिबियात ही परिस्थिती का ओढवली?
नामिबिया हा आफ्रिका खंडातील दक्षिण टोकाला असणारा देश आहे. हा भाग कायमच दुष्काळप्रवण राहिलेला आहे. मात्र, यंदा इथे गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. यापूर्वी नामिबियात 2013, 2016, 2019 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. मात्र, यंदाचा दुष्काळ हा अधिक व्यापक आणि भीषण आहे. या दुष्काळाची सुरुवात ऑक्टोबर 2023 मध्ये बोटसवाना येथे झाली. त्यानंतर अँगोला, झाम्बिया, झिम्बाम्ब्वे आणि नामिबिया या देशांमध्येही दुष्काळ पडला. एल निनो वाऱ्यांमुळे येथील वातावरणात मोठे बदल झाले होते. या भागात प्रचंड उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. या भागात वर्षाला होणाऱ्या एकूण पावसाच्या निम्मा पाऊसच पडला आहे. या भीषण दुष्काळामुळे शेतातील पिके वाळून गेली. नामिबियातील नागरिक आणि जनावारांना खाण्यासाठी काही उरलेले नाही. त्यामुळे देशातील पाळीव प्राणी अन्नपाण्याअभावी तडफडून मेले आहेत.
त्यामुळे आता येथील सरकारने देशातील नागरिकांना अन्न पुरवण्यासाठी आपला मोर्च वन्यप्राण्यांकडे वळवला आहे. त्यामुळे आता हत्ती, पाणघोडे, झेब्रे आणि रानगव्यांची मोठ्याप्रमाणावर कत्तल केली जाणार आहे. या प्राण्यांची कत्तल केल्याने खाण्यासाठी मांस उपलब्ध होण्यासोबतच अनेक ठिकाणी प्राणी आणि वन्यजीवांमध्ये अन्नपाण्यासाठी होणारा संघर्ष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासंदर्भातील मजकूर सध्या जगभरातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, आतापर्यंत कोणीही त्यामध्ये हस्तक्षेप करुन नामिबियाला मदत करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही.
आणखी वाचा
बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांना माहेरघरीच सासुरवास, वन्यप्राणी उपचार केंद्राच्या प्रतीक्षेत
मानव आणि वन्यप्राणी संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस बिकट! अहवालातील कटू सत्य...