Mumbai 1993 serial blast : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाने अवघ्या देशाला हादरवलं. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात आहेत. या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझी  याचा मृत्यू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, शनिवारी पाकिस्तानमधील कराचीमध्ये सलीम गाझी याचा मृत्यू झाला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं मुंबई पोलिसांच्या सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


1993 च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझी हा दाऊद टोळीचा सदस्य होता. सलीम गाझी छोटा शकीलचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जायचा. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून सलीम गाझी आजारी होता. त्याला  हाय ब्लडप्रेशरसह अन्य आजारही होते. रिपोर्ट्सनुसार, शनिवारी कराचीमध्ये सलीम गाझी याचा हर्टअॅटकने मृत्यू झाला. 






12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?
13 मार्च 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला. कुणी आपली आई..तर कुणी बाबा…कुणी भाऊ, तर कुणी बहीण गमावली. या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले, ज्यांच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत. 


12  मार्च 1993 रोजी काय झालं ? 
पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोटाठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोटा झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले. 
दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट 
तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन 
चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग 
पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार 
सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम 
सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार 
आठवा स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल 
नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा 
दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल
अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ 
बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल 


बॉम्बस्फोटानंतर काय झालं?



  • 4 नोव्हेंबर 1993 रोजी 10 हजार पानांचं 189 जणांविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल

  • 19 नोव्हेंबर 1993 रोजी प्रकरणं सीबीआयकडे सुपूर्द



  • 19 एप्रिल 1995 रोजी मुंबईतील टाडा कोर्टात सुनावणी सुरु



  • टाडा कोर्टाकडून आरोपींविरोधात आरोप निश्चिती



  • ऑक्टोबर 2000 मध्ये सरकारी पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब घेतले गेले



  • ऑक्टोबर 2001 मध्ये सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण



  • सप्टेंबर 2003 मध्ये संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण



  • सप्टेंबर 2006 मध्ये कोर्टाने निर्णय देणं सुरु केलं



  • या प्रकरणात एकूण 123 आरोपी होते, ज्यामधील 12 जणांना कनिष्ठ कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. यामधील 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे.  याशिवाय इतर 68 जणांना जन्मठेपेहून कमी शिक्षा सुनावली गेली होती. मात्र, त्यातील 23 जण निर्दोष सुटले.



  • नोव्हेंबर 2006 मध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पिस्तूल आणि एके-56 रायफल्स ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.



  • 1 नोव्हेंबर 2011 मध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली



  • सुप्रीम कोर्टात 10 महिने सुनावणी सुरु राहिली



  • ऑगस्ट 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. 2006 साली मुंबई कोर्टाने सुनावणीत निर्णय दिला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश होता. त्यामध्ये याकूब मेमन, यूसूफ मेमन, इसा मेमन आणि रुबिना मेमन यांचा समावेश होता. या सर्वांवर बॉम्बस्फोटाचा कट आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

  • मुंबईच्या टाडा कोर्टाने याकूबला फाशी सुनावल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. अनेक वाद-विवादांनंतर अखेर 30 जुलै 2015 रोजी सकाळी 7 वाजता याकूब मेमनला फाशी देण्यात आली.