Monkeypox Symptoms : कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सनं (Monkeypox) देशाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. अशातच ब्रिटनमधील एका संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनमधील एका अभ्यासानुसार, मंकीपॉक्सची नवीन लक्षणं समोर येत आहेत. जी जुन्या लक्षणांपेक्षा खूपच वेगळी आहेत. मंकीपॉक्सची लागण झालेल्या काही रुग्णांच्या खाजगी भागांत जखमा दिसून आल्या आहेत. ब्रिटनमधील रुग्णांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी शुक्रवारी ही माहिती दिली. 


काही महिन्यांपूर्वीपर्यंत मंकीपॉक्स पश्चिम आणि मध्य आफ्रिकेपर्यंत मर्यादित होता. परंतु आता जगातील अनेक देशांमध्ये त्याचा प्रसार वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मे महिन्यापासून, जगभरात मंकीपॉक्सच्या 3,400 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी बहुतेक नवे रुग्ण पश्चिम युरोपमधील आहेत, जे पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवतात. म्हणजेच, या नव्या रुग्णांमध्ये समलैंगित पुरुषांचा समावेश आहे. तथापि, उप-सहारा आफ्रिकन रुग्णांशी त्यांचा काहीही संबंध नाही. 


ब्रिटनमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आलेले मंकीपॉक्सचे रुग्ण आणि त्यांच्यात आढळलेली लक्षणं यांचा अभ्यास करुन संशोधन करण्यात आलं आहे. द लॅन्सेट संसर्गजन्य रोग जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. 


संशोधनकर्त्यांनी लंडनमधील मंकीपॉक्सची लागण झालेल्या 54  समलैंगिक पुरुषांवर संशोधन केलं होतं. या दोघांव्यतिरिक्त कोणालाच माहीत नव्हतं की, ते मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. ज्यावेळी या पुरुषांना  मंकीपॉक्सची लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्यापैकी एक चतुर्थांश पुरुष एचआयव्ही पॉझिटिव्ह होते आणि एक चतुर्थांश पुरुष लैंगिक रोगांचा सामना करत होते. एवढंच नाहीतर, या सर्व रुग्णांना त्वचेच्या समस्याही उद्भवल्या होत्या. तर त्यापैकी 94 टक्के त्वचेच्या समस्या जननेंद्रियाच्या आणि गुदद्वाराच्या भागांत उद्भवल्या होत्या. 


संशोधनातून स्पष्ट करण्यात आलं आहे की, या लक्षणांवरुन असं लक्षात आलं की, लैंगिक संबंध ठेवताना त्वचेमार्फत विषाणूचा संसर्ग होतो.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मंकीपॉक्सची लक्षणं ओळखण्यासाठी वीर्य चाचण्या करत आहे, परंतु हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरत नाही आणि सुरुवातीला जवळच्या संपर्कातून पसरत असल्याचंही सांगितलं जात आहे. 


मंकीपॉक्सची लक्षणं काय? 


तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.


कसा वाढतो संक्रमणाचा धोका?


संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.


जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स रोगावर सध्या कोणतेही अचूक उपचार नाहीत. या रोगाची लागण झाल्यावर, लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णावर उपचार केले जातात. मंकीपॉक्स रोखण्यासाठी कांजण्यांवरचे लसीकरण 85 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.