Moderna  COVID-19 vaccine doses : मॉर्डना या अमेरिकेतील औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा निम्मी करण्याचा निर्णय घेतलाय, यामुळे कमी कालावधीत जास्त लसीची निर्मिती होऊ शकेल, तसंच लहान मुलांनाही या लसीचे डोस देता येऊ शकतील. कमी मात्रेचे हे डोस कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिअंटचा सामना करण्यासाठी सक्षम असतील असं मॉडर्नाने म्हटलंय.


मॉडर्नाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रत्येक डोस सध्या 100 मायक्रोग्रामचा आहे, यापुढे तो 50 मायक्रोग्रामचा असणार आहे.


यासाठी मॉर्डनाने स्वित्झर्लंडमधील औषध निर्मिती कंपनी लोंझा सोबत करार केला आहे. लोंझाच्या नेदरलँडमधील युनिटमध्ये दरवर्षी 50 मायक्रोग्रॅमचे 30 कोटी डोस दरवर्षी बनवण्याची क्षमता आहे. पुढील दोन वर्षात म्हणजे साधारण 2022 पर्यंत 100 मायक्रोग्राम आणि 50 मायक्रोग्राम असे दोन डोस बाजारात बऱ्यापैकी उपबल्ध असतील असंही मॉडर्नाच्या प्रवक्याने म्हटलंय.


सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसचं प्रमाण हे सर्वसाधारण पणे 100 मायक्रोग्रॅस असावं असे निर्देश आहेत, मात्र मॉडर्नाचे संशोधक अनेक दिवसांपासून कमी मात्रेच्या म्हणजे 50 मायक्रोग्रामच्या कोरोना लसीवर काम करत आहेत. यामुळे लहान मुलांसोबतच प्रौढांमधील मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण पार पडेल असा विश्वास मॉडर्नाच्या प्रवक्त्याने व्यक्त केला.


मॉडर्नाने केलेल्या चाचण्यांमध्ये 50 मायक्रोग्रामच्या कोरोना प्रतिबंधक लसी वेगवेगळ्या व्हेरिअंटचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचं सिद्ध झालंय. तसंच लहान मुलांना 100 मायक्रोग्रामचा पूर्ण डोस देण्याची आवश्यकता नाही, त्यांना 50 मायक्रोग्रामचा डोस पुरेसा असल्याचंही संशोधनात सिद्ध झाल्याचं मॉडर्नाच्या प्रवक्त्याने सांगितलं. मॉडर्नाने लोंझासोबतच स्पेनच्या रोवी या औषध निर्माण कंपनीसोबत केलेल्या करारामुळे युरोपमध्ये वार्षिक 60 कोटी लसींचा पुरवठा करणं मॉडर्नाला शक्य होणार आहे.


फायजर आणि बायोएनटेकच्या एमआरएनए श्रेणीतल्या कोरोना प्रतिबंधक लसी 12 ते 15 वयोगटातील मुलांना देण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत मंजुरी मिळाली आहे. फायजरपाठोपाठ मॉडर्नानेही लहान मुलांच्या लसीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केलेत. त्यांची लस लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केलाय. यावर्षी मॉडर्ना आपली उत्पादन क्षमता 80 कोटींवरुन डोसवरुन 1 अब्ज डोसपर्यंत वाढवणार आहे तर 2022 पर्यंत ही उत्पादन क्षमता 3 अब्ज डोसपर्यंत वाढण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.