अबुजा : नायजेरियात हवाई दलाच्या एका चुकीमुळे 100 नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानानं चुकून निर्वासितांच्या कॅम्पवर बॉम्ब फेकले. नायजेरीयातील दहशतवादी संघटना बोको हराम विरोधातील मोहिमेअंतर्गत कारवाई नायजेरीयाकडून सुरु आहे. बोको हरामचे तळ उद्धस्त करताना बॉम्ब निर्वासितांच्या कॅम्पवर पडल्यानं 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


या घटनेत 100 निर्वासितांसोबतच 20 स्वयंसेवकांचाही मृत्यू झाला आहे. नायजेरियाला शरण आलेल्या निर्वासितांच्या मदतीला हे 20 स्वयंसेवक त्याठिकाणी कार्यरत होते. चुकून बॉम्बहल्ला झाल्यानंतर नायजेरिअन हवाई दलानं जखमींना हेलिकॉप्टरनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

बोको हराम ही दहशतवादी संघटना नायजेरियातील सत्ता उलथवून त्याठिकाणी इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुस्लिम धर्मगुरु मोहम्मद युसूफ यांनी 2002 मध्ये बोको हरामची स्थापना केली होती. गेल्या काही दिवसांत नायजेरिअन सेना आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होण्याच्या बातम्या आहेत. मात्र चुकून बॉम्ब पडल्यानं नागरिकांचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.