Facebook Meta Layoffs: जगात सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मीडिया साईट फेसबुकने (Facebook) आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 11 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाने बुधवारी सांगितले की, कंपनी वाढत्या खर्च आणि कमी झालेल्या जाहिरात, यामुळे कंपनी बाजारपेठेशी झुंजत असल्याने या वर्षी कर्मचारी कपात करण्यात येत आहे. कंपनीने 13 टक्के म्हणजेच 11,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. गेल्या 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत आहे. अलीकडे, मायक्रोसॉफ्टसह अनेक दिग्गज कंपन्यांनीही आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.


मार्क झुकरबर्ग म्हणाला सॉरी  


कर्मचारी कपात केल्यानंतर मार्क झुकरबर्ग (mark zuckerberg) याने कर्मचाऱ्यांना एक संदेश पाठून सॉरी म्हणाला आहे. तो आपल्या संदेशात म्हणाला आहे की,  "ऑनलाइन कॉमर्स पूर्वीच्या स्थितीत परतला आहे, तर मॅक्रो इकॉनॉमिक मंदी, वाढलेली स्पर्धा आणि जाहिरात-सिग्नलचे नुकसान यामुळे आमचा महसूल अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे.'' तो पुढे म्हणाला की "माझ्याकडून चूक झाली आणि मी त्याची जबाबदारी घेतो. मला माहित आहे की, हे प्रत्येकासाठी कठीण आहे आणि मला विशेषतः ज्यांची नोकरी गेली त्यांच्यासाठी वाईट वाटत आहे."






कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार इतके पैसे 


मेटाने सांगितलं आहे की, ते कामावरून काढून टाकलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 16 आठवड्यांचे मूळ वेतन वेगळे पॅकेज म्हणून देतील. याशिवाय प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी दोन अतिरिक्त आठवडे मूळ वेतन उपलब्ध असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आम्ही पुढील 6 महिन्यांसाठी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्य विमा खर्च कव्हर करू.


कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही कामावरून काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना बाहेरील व्हेंडरसह तीन महिन्यांचे करिअर सपोर्ट देऊ. मेटाने सांगितले की, ते खर्चात कपात करण्याची आणि पहिल्या तिमाहीत हायरिंग फ्रीझ वाढवण्याची योजना आखत आहे.