सिएटल : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग झाला. अलास्का एअरलाईन्समधून रॅन्डी झुकरबर्ग प्रवास करत असताना शेजारच्या प्रवाशाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं. लॉस एंजेलिसवरुन मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला.


हा प्रवासी वारंवार अश्लील संभाषण करुन रॅन्डी झुकरबर्गला त्रास देत होता. इतकंच नाही तर रॅन्डी आणि इतर महिला प्रवाशांबद्दल अश्लील कमेंट्स करत होता. सोबतच मद्यपानही करत होता.

रॅन्डीने याबाबतची तक्रार विमानातील कर्मचाऱ्यांना केली असता त्यांनी रॅन्डीलाच सीट बदलून देण्याची ऑफर दिली. "माझाच विनयभंग होत असताना, मीच का माझी सीट सोडून जायचं असा विचार माझ्या डोक्यात आला," असं रॅन्डी म्हणाल्या.

शेजारी बसलेला प्रवासी मला आणि फर्स्ट क्लासमध्ये बसलेल्या इतर लोकांवर अश्लील शेरेबाजी करत होता. हा प्रवासी हस्तमैथुन आणि माझ्यासोहत प्रवास करणाऱ्या कलीगबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करत होता. तसंच विमानात चढणाऱ्या महिला प्रवाशांच्या शरीराबाबत अश्लील शेरेबाजी करत होता, असं रॅन्डी झुकरबर्ग यांनी एअरलाईन्सला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान रॅन्डी झुकरबर्गने सोशल मीडियातून ही बाब उघडकीस आणल्यानंतर अलास्का एअरलाईन्सने स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असून संबंधित प्रवाशाच्या सर्व सुविधा रद्द केल्याचं एअरलाईन्सने सांगितलं.