इस्लामाबाद : 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या मुसक्या पुन्हा एकदा पाकिस्तानं आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हाफिजची नजरकैदेतून पाकिस्तानानं सुटका केली होती. मात्र, भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तानानं नरमाईची भूमिका घेतली आहे.


हाफिजला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेनंही सातत्यानं पाकिस्तानवर दबाव टाकला होता. मात्र, हाफिजविरोधातील खटला जाणूनबुजून कमकुवत केला जाईलं. असा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा कयास आहे.

हाफिजला नजरकैदेतून मुक्त केल्यानंतर भारतानं याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याचवेळी अमेरिकेनंही पाकिस्तानला स्पष्ट शब्दात खडसावलं होतं.

दरम्यान, पाकिस्ताननं हाफिजला पुन्हा ताब्यात जरी घेतलं असलं तरीही त्याच्याविरुद्धचा खटला कमकुवत करुन  त्याला कोर्टातून पुन्हा दिलासा मिळू शकतो.

24 नोव्हेंबरला पाकिस्तानच्या एका कोर्टानं पुराव्याअभावी हाफिजची नजरकैदेतून सुटका केली होती. सुटकेनंतर लाहोरमध्ये केक कापून हाफिजने सेलिब्रेशन केलं होतं. यावेळी हाफिजचं अभिनंदन करण्यासाठी जमात-उद-दावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून हटवा, हाफिज सईदची UNकडे मागणी

दरम्यान, याआधी हाफिज सईदने संयुक्त राष्ट्रात एक याचिका दाखल करुन, आपलं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी केली आहे. सईदने आपल्या लाहोरमधील मिर्जा अॅण्ड मिर्जा कंपनीद्वारे ही याचिका संयुक्त राष्ट्रात दाखल केली आहे. हाफिजने ही याचिका नजरकैदेत असताना दाखल केली असल्याचं वृत्त आहे.

कोण आहे हाफिज सईद?

हाफिज सईद जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची स्थापनाही त्यानेच केली आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत ट्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यातही त्याचा होत होता. शिवाय तो मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. हाफिज सईद भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.

एप्रिल 2012 मध्ये, अमेरिकेने दहशतवादासाठी जबाबदार असलेल्यांची यादी जारी केली. या यादीत हाफिज सईदचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. अमेरिकेने हाफिज सईदला पकडून देण्यासाठी एक कोटी डॉलरचं बक्षीसही जाहीर केलं आहे. तर भारताने त्याच्या विरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही जमात-उद-दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.

संबंधित बातम्या :

माझं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून हटवा, हाफिज सईदची UN कडे मागणी

हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं

हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता

26/11 ला 9 वर्षे पूर्ण, हल्ल्याचा मास्टरमाईंड अजूनही मोकाट

‘हाफिजच्या खात्म्यासाठी परदेशी यंत्रणांकडून 8 कोटीची सुपारी’