वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा महाभियोग प्रस्ताव 230 विरुद्ध 197 च्या फरकाने संमत झाला आहे. सत्तेचा गैरवापर करत युक्रेनला राजकीय विरोधकांच्या चौकशीसाठी आदेश दिल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे.
हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हमध्ये महाभियोग मंजूर झालेले ट्रम्प हे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला असला तरी, सीनेटमध्ये ट्रम्प यांचं बहुमत असल्याने तिथे हा प्रस्ताव संमत होणं कठीण आहे. त्यामुळे अजून तरी ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीला धक्का लागणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
निवडणुकीत जो बिदेन (ट्रम्प यांचे विरोधक) यांना नुकसान पोहोचवण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनकडून मदत घेतली. ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदायमीर झेलेन्स्की यांच्यावर दबाव टाकून त्यांना बिदेन आणि त्यांचे पूत्र हंटर या दोघांची चौकशी सुरु करण्यास भाग पाडले. त्या बदल्यात अमेरिकेकडून वेगळ्या स्वरुपात युक्रेनची परफेड करण्यात आली.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या (सभागृह) अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्याकडे महाभियोगाची कारवाई करु नये, अशी मागणी केली होती. ट्रम्प म्हणाले की, माझ्यावरील महाभियोगासाठी डेमॉक्रॅट सदस्यांनी घटनाबाह्य गोष्टींचा वापर केला आहे. महाभियोग संमत करण्यात शहाणपणा नाही. डेमोक्रॅटिक पक्षाने महाभियोग शब्दाचा अर्थ आणि विश्वासार्हता गमावली आहे.
ट्रम्प पेलोसी यांना म्हणाले की, महाभियोगाला तुम्ही मान्यता देऊ नका. तसे केले तर ही बाब अमेरिकन राज्यघटनेचे उल्लंघन ठरेल. हा महाभिगोग मंजूर करुन तुम्ही लोकशाहीविरोधात आहात, हे सिद्ध केले आहे. दरम्यान, मला मात्र माझी बाजूदेखील मांडू दिली जात नाही.