लंडन : ब्रिटनने भारताला 72 व्या स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट दिली. बिहारच्या नालंदामधील संग्रहालयातून 60 वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली गौतम बुद्धांची मूर्ती देशाला परत करण्यात आली. लंडन मेट्रोपोलिटन पोलिसांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात बाराव्या शतकातील ही कांस्य मूर्ती परत केली.

नालंदामध्ये असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थानाच्या संग्रहालयातून 1961 साली 14 मूर्ती चोरण्यात आल्या होत्या. त्यापैकी ही एक मूर्ती आहे. चांदीचा मुलामा जडवण्यात आलेली ही कांस्याची मूर्ती बाराव्या शतकात तयार करण्यात आली होती.

लंडनमध्ये ही मूर्ती लिलावात निघाली, तेव्हा ही तीच चोरलेली मूर्ती असल्याचं समोर आली. त्यामुळे मूर्तीच्या डीलर आणि मालकाला याविषयी माहिती देण्यात आली. अखेर त्यांनी कला आणि पुरातत्व विभागाशी सहकार्य करुन मूर्ती भारताला परत करण्याची तयारी दाखवली. मात्र सहा दशकांच्या कालावधीत ती मूर्ती कित्येक जणांनी हाताळली असेल, असा कयास वर्तवला जात आहे.

इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यदिनी स्कॉटलंड यार्डाने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ब्रिटनमधील भारतीय राजदूत वाय. के. सिन्हा यांच्याकडे ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली. 'अनमोल बुद्धा'ची मूर्ती परत करुन ब्रिटनने चांगलं पाऊल उचलल्याची भावना सिन्हांनी व्यक्त केली