Life after sumo : सुमो म्हटलं की, मोठं शरीर, डोक्यावर केसांचा चंबू आणि कुस्ती असं चित्र लगेच डोळ्यांसमोर उभं राहतं. ‘सुमो’ अर्थात जपानी कुस्ती. हा जपानमधील पारंपरिक कुस्तीचा प्रकार आहे. अगदी वयाच्या 15व्या वर्षी मुलांना, तरुणांना या खेळांच्या गटांत सामील करून घेतलं जातं. लहान वयात या कुस्तीचं औपचारिक प्रशिक्षण घेऊन ही मुलं तिथेच राहू लागतात. मात्र, जेव्हा हे सुमो कुस्तीपटू निवृत्त होऊन कुस्तीच्या रिंगणातून बाहेर पडतात, तेव्हा त्यांचे पुढील आयुष्य अतिशय खडतर असते.


एखाद्या खेळातून जेव्हा खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा तो इतर क्षेत्रात सहज करिअर करू शकतो. मात्र, सुमो कुस्तीपटूंसाठी निवृत्तीनंतर करिअर किंवा नोकरी करणे अजिबात सोपे नसते. सुमोच्या विश्वात रमलेल्या लोकांसाठी मात्र हे मोठे आव्हान आहे. निवृत्तीची निशाणी म्हणून सुमोंच्या डोक्यावरील केसांचा चंबू कापून टाकला जातो.


नोकरी शोधायला सुरुवात केली अन्


जपानी सुमो कुस्तीपटू ताकुया सायटो यांनी वयाच्या 32व्या वर्षी ‘सुमो’च्या रिंगणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. निवृत्ती घेतल्यानंतर ताकुया यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना अनेक ठिकाणांहून नकार मिळाला. या नकाराचं कारणही तसंच होतं. ताकुया यांना कोणताही व्यावसायिक अनुभव नव्हता. इतकंच नाही तर, संगणक कसा वापरायचा हे देखील त्यांना माहित नव्हतं.


सायटो यांनी जेव्हा कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आपण ‘बेकर’ व्हायचं, असं त्यांनी ठरवलं होतं. ते त्यांच्या एका आवडत्या कार्टूनपासून प्रेरित झाले होते. या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणतात, ‘मी अनेक ठिकाणी यासाठी प्रयत्न केला, तेव्हा मी किचनमधील जागेसाठी खूप मोठा आहे, असे म्हणून नोकरी नाकारण्यात आली. त्यानंतरही मी अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. पण, अनुभव नसल्याने सगळीकडून केवळ नकारच मिळाला.’


अनेक पर्याय असतात, मात्र...


करिअरच्या एका उंचीवर पोहचलेले सुमो कुस्तीपटू अर्थात ‘रीकीशी’ स्वतःचे सुमो प्रशिक्षण केंद्र सुरु करू शकतात. मात्र, ते सगळ्यांसाठी सोपे नसते. एएफपीच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षात 89 सुमो निवृत्त झाले, त्यापैकी केवळ 7 लोकांनी स्वतःचे केंद्र सुरु केले. इतरांसाठी हॉटेलक्षेत्रात संधी उपलब्ध असून शकते. हे लोक प्रशिक्षण केंद्रातील लोकांसाठी मोठ्याप्रमाणावर अन्न तयार करतात. उरलेले लोक एक तर मालिश करण्याचं काम करतात किंवा सिक्युरिटी गार्ड बनतात.


सायटो म्हणतात, ‘नोकरी शोधताना मनात न्यूनगंड निर्माण व्हायला लागतो. नोकरी शोधणं ही सुमोच्या प्रशिक्षणापेक्षा कठीण वाटायला लागतं. सुमोच्या रिंगणात आम्हाला संरक्षण असतं.’ त्यांना देखील त्यांच्या प्रशिक्षकांनी काही दिवस राहण्यासाठी जागा आणि खाण्यापिण्याची सोय करून दिली होती.



मात्र, काही कुस्तीपटू फार लवकर खेळ सोडतात. अशावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे देखील नसतात. कारण काही ठराविक लोकांना सोडून, इतरांना अर्थात नव्या लोकांना केवळ खाणं, प्रवास खर्चच दिला जातो. अशांसाठी बाहेर पडल्यानंतरचे आयुष्य खूप कठीण असते.


सुमोंची मदत करण्याचा निर्णय


सायटो यांनी स्वतःचं काहीतरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक परीक्षा देऊन इतर माजी कुस्तीपटूंना मदत करण्याच्या आशेने रेस्टॉरंट्सशी संबंधित प्रक्रियांमध्ये विशेषज्ञ होण्याचा पर्याय निवडला. त्यांचे पहिले ग्राहक हे सुमो क्षेत्रातील त्यांचे एक मित्र होते, जे रेस्टॉरंट उद्योगात सामील झाले होते. सुमोचे आयुष्य केवळ सुमोच समजू शकतो, असे ते म्हणतात.


याशिवाय काही निवृत्त आणि वृद्ध सुमोंसाठी एक संस्था देखील काम करते. यात बहुतांश लोक हे सुमो विश्वातील सक्रिय खेळाडूंना वेगवेगळ्या सेवा पुरवतात. जसे की, ते मालिश करणे, जेवण बनवणे, त्यांना काही टिप्स देणे, तसेच त्यांच्याशी गप्पा मारण्याचे काम करतात. यात, सुमोतून निवृत्ती घेणाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन तसेच समुपदेशन करण्यासाठी देखील एक गट काम करतो. ‘सुमो हे एक जग आहे जिथे तुम्हाला लढा जिंकण्यासाठी तुमचा जीव धोक्यात घालण्याची तयारी ठेवावी लागते’, असे माजी सुमो कुस्तीपटू हिदेओ इटो म्हणतात.


 हेही वाचा :