इस्लामाबाद : पाकिस्तानने पहिल्यांदाच भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव, ज्यांना हेरगिरीच्या आरोपांवरुन फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.


कुलभूषण जाधव त्यांच्या दया याचिका अधिकाराचा वापर करत नाहीत, तोपर्यंत त्यांना फाशी देण्यात येणार नाही, असा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. भारताने सतत आंतरराष्ट्रीय दबाव वाढवल्यानंतर पाकिस्तानला हा निर्णय घ्यायला भाग पडावं लागलं, असं बोललं जात आहे.

पाकिस्तानमध्ये गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समिती म्हणजेच एनएससीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह लष्कर प्रमुख आणि सर्व महत्वाचे मंत्री उपस्थित होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कोर्टात केस लढवणाऱ्या भारताला हा मोठा दिलासा आहे.

कुलभूषण जाधव हे पहिल्यांदा लष्कर प्रमुख आणि त्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु शकतात. ते या अधिकाराचा वापर करत नाहीत, तोपर्यंत त्यांना फाशी दिली जाणार नाही, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नफीस जकारिया यांनी सांगितलं.

दरम्यान आंरराष्ट्रीय कोर्टानेही कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. मात्र पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचा हा निर्णय मान्य करणार का, हा सर्वात मोठा प्रश्न होता. कारण पाकिस्तानने या निर्णयाविरोधात याचिकाही दाखल केली आहे. ज्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात 8 जून रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी पाकिस्तानची रणनिती काय असेल, याचा आढावा घेण्यासाठी एनएससीची बैठक बोलावली असल्याचं बोललं जात आहे.