Justin Trudeau : कोविड-19 बाबत सरकारनं सांगितलेल्या नियमांचा विरोध करण्यासाठी नाकेबंदी करणाऱ्या आंदोलकांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी कडक इशारा दिला आहे. त्यांनी आंदोलकांना सांगितले की, आम्ही तुमचे ऐकले आहे आता घरी जाण्याची वेळ आली आहे. 


शुक्रवारी (11 फेब्रुवारी) जस्टिन ट्रुडो यांनी आंदोलकांना सांगितले, 'तुम्ही असेच आंदोलन सुरू ठेवले तर तुमचा परवाना रद्द होईल तसेच तुमच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येईल. त्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि तुमच्या आयुष्यावर होईल. अमेरिका तसेच इतर देशांमध्ये जाण्यासाठी देखील तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. '


पुढे त्यांनी सांगितले,  'आम्ही लोक सुरक्षित राहावेत म्हणून कोरोनासंबंधित काही नियम पाळण्याचे आवाहन लोकांना केले. पण त्याबद्दलची तुमची निराशा आम्हाला कळाली. आम्ही तुमचे ऐकले पण आता तुम्ही  घरी जाण्याची वेळ आली आहे.'


कॅनडाच्या सरकारने कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. सीमा ओलांडण्यासाठी लसीकरण बंधनकारक केले आहे. त्यामुळे नागरिकांना विशेषत: ट्रक चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, कॅनडाच्या सरकारने यूएसमधून येणाऱ्या सर्व ट्रक चालकांना पूर्णपणे लसीकरण करणे अनिवार्य केले. याशिवाय लसीकरण न झालेल्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळेच आंदोलकांमध्ये ट्रक चालकांची संख्या लक्षणीय आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha