Drink More Boost Economy : दारु (Alcohol) शरीरासाठी किती नुकसानदायक आहे, आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे लोक दारुपासून लांब पळतात. एकीकडे लोक दारुचं व्यसन सोडवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. बहुतेक जण दारुचं व्यसन सोडण्याचा सल्ला आणि विचार करतात. मात्र जपानमध्ये (Japan) चक्क सरकारकडूनच नागरिकांना विशेष म्हणजे तरुणांना दारु पिण्याचं आवाहन करण्यात येत आहे. इतकंच नाही तर सरकारकडून यासाठी वेगवेगळे उपक्रमही राबवण्याचा विचार सुरु आहे. जपानची सरकार तरुणांना दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
जपानमधील तरुण पिढीचं दारु पिण्याचं प्रमाण प्रोढांच्या दारू पिण्याच्या प्रमाणापेक्षा कमी आहे. त्यामुळे दारूवरील कर कमी झाला आहे. याचा परिणाम महसुलावर होऊ शकतो. महसुलात कपात झाली तर भविष्याची चिंता जपान सरकारला वाटू लागली आहे. नागरिकांना दारू प्यायला लावण्यासाठी सरकारने व्यवसायाची कल्पना मागवली आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून सरकारने ही कल्पना मागवली आहे. या स्पर्धेत पुरस्काराची योजनाही ठेवण्यात आली आहे. तरुण पिढीमध्ये अधिक मद्यपान केल्याने जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. स्पर्धेत, सहभागींना जास्त मद्य सेवन, आकर्षक ब्रँडिंग आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मुख्य कल्पना द्यावी लागेल.
दारु पिण्यासाठी स्पर्धेचं आयोजन
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 20 ते 39 वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात. या विचारांतर्गत तरुणांना त्यांच्या पिढीत दारूचे सेवन कसे अधिक प्रमाणीत करता येईल सुचवावं लागेल. दारु विक्रीत लक्षणीय घट झाल्याने हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. आहे. यामध्ये स्पर्धकांमध्ये प्रमोशन, ब्रँडिंग यासह अत्याधुनिक योजनांवरही रणनीती आखावी लागेल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला प्राधान्य दिले जाईल.
जपानमध्ये एक तृतीयांशहून जास्त तरुण पिढी
जागतिक बँकेच्या मते, जपानमध्ये एक तृतीयांशहून जास्त तरुण पिढी आहे. जपानमधील लोकसंख्येपैकी एक तृतीयांश म्हणजेच 29 टक्के लोकसंख्या 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. जगातील सर्वाधिक प्रमाण जपानमध्ये आहे. जपानची चिंता केवळ अर्थव्यवस्थेची नाही. त्यापेक्षा काही नोकऱ्या, तरुण कर्मचाऱ्यांचा पुरवठा, भविष्यात वृद्धांची काळजी आदी समस्याही सोडविण्याचे नियोजन केले जात आहे.
दारु पिण्याचं प्रमाण घटलं
जपान सरकारने तरुणांना अधिक दारू पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मोहिमेसाठी एक वेबसाइट देखील सुरु केली आहे. टॅक्स एजन्सीच्या अलीकडील आकडेवारीनुसार, 1995 च्या तुलनेत 2020 मध्ये लोक कमी दारू पीत होते. अंदाजे दारु सेवन एक चतुर्थांश कमी झालं आहे. जपान टाइम्स वृत्तपत्रानुसार, 1980 मध्ये एकूण महसुलाच्या पाच टक्के महसूल दारुवरील कराने गोळा केले. तर 2020 मध्ये हा आकडा केवळ 1.7 टक्के होता.
जपानी माध्यमांनी दिली 'ही' माहिती
जपानी माध्यमांनी सांगितलं आहे की, 'आरोग्यसाठी हानिकारक असलेल्या दारू पिण्याच्या आवाहनाबाबत जपान सरकारला टीकेसह संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांनी आपले विचार सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत. इच्छुक तरुण सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत याउपक्रमात सहभागी होऊ शकतात. नोव्हेंबरमध्ये अंतिम प्रस्ताव मांडण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. यानंतर, अधिक दारू पिण्यासाठी जपान सरकारकडून एक योजना विकसित केली जाईल.'