China Coronavirus Deaths : चीनने (China) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा वेगाने कोरोना संसर्ग पसरताना दिसत आहे. चीनमधील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक प्रांतामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. या दरम्यान, हाँगकाँगमधील एका रिपोर्टने चिंता अधिक वाढवली आहे. हाँगकाँगमधील  शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, एका संशोधनानुसार, चीनमध्ये 20 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे चीन सरकारने कोरोना निर्बंध हटवले आहेत. 


ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, चीनमधील 1.41 बिलियन लोकसंख्येच्या आधारावर सुमारे 9,64,400 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होईल. हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांनी सांगितलं की, संशोधनानुसार चीनमधील सर्व प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार थोपवण्यात आणि संसर्गाचा सामना करण्यात आरोग्य प्रशासन असमर्थ ठरेल.


मृत्यू कसे रोखता येतील?


संशोधकांच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये पर्यंत कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता आहे. जानेवारी 2023 चीनमधील लॉकडाऊन हटवण्यात येऊ नये. कोरोना लसीकरणात वाढ आणि अँटीव्हायरल औषधांचा पुरेसा साठा यामुळे कोरोना मृत्यू कमी करण्यात मदत होईल. यामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 26 टक्क्यांनी कमी होईल.


चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर


चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरु आहे. अशातच सरकारने पुन्हा एकदा झिरो कोविड नियम लागू केले होते. मात्र, नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन करत सरकारला निर्बंध मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे सरकारने गेल्या आठवड्यापासून कोविड निर्बंध शिथिल केले आहेत. पण परिणामी चीनमधील परिस्थिती अधिक बिघडत चालली आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. व्हायरल फ्लू आणि ताप या सारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.


राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा वाढता कहर


बीजिंगच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते ली आंग यांनी सोमवारी एका ब्रीफिंगमध्ये सांगितले, 'बीजिंगमध्ये साथीच्या रोगाचा वेगवान प्रसार होणं सुरुच आहे.ताप आणि फ्लू सदृश प्रकरणांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 


आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता


आरोग्य सल्लागार झोंग यांनी चीन सरकारला कोरोनाबाबत इशारा दिला आहे. झोंग यांनी म्हटलं आहे की, 'सध्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा अधिक संसर्ग झाल्याचं दिसून येत आहे. एक व्यक्ती सुमारे 22 लोकांना विषाणूचा प्रसार करू शकतो. चीनमध्ये सध्या कोरोना रोग वेगाने पसरत आहे, अशा परिस्थितीत कोविड प्रतिबंध आणि नियंत्रण कितीही मजबूत असले तरीही संक्रमण साखळी पूर्णपणे तोडणे कठीण होणार आहे.