इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक स्थिती (Pakistan Economic Crisis) खूपच वाईट झाली असून त्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतोच आहे. आतातर परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, त्यांना खर्च भागवण्यासाठी परदेशातील मालमत्ता विकावी लागत आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील पाकिस्तानी दूतावासाची इमारत विकण्यासाठी पाकिस्तानने नुकत्याच अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या आहेत. 


पाकिस्तानी मीडियाच्या बातमीनुसार अमेरिकेत तैनात असलेल्या पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार मिळाला नाही. एवढेच नाही तर पैसे न मिळाल्याने जर्मनीतील पाकिस्तानी दूतावासातील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.


वॉशिंग्टनचे आर. रस्त्यावरील इमारत 1950 पासून 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दूतावासाचा संरक्षण विभाग आहे. त्याची किंमत सुमारे 13 कोटी पाकिस्तानी रुपये आहे. गेल्या 20 वर्षांपासून ती रिक्त असून, जीर्ण अवस्थेत आहे. वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्यानंतर अनेकांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला आहे. पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.


पाकिस्तानवर अशी परिस्थिती का आली?


आयएमएफ, जागतिक बँक, चीन आणि इतर देशांकडून पाकिस्तानला मिळालेले कर्ज एकूण जीडीपीच्या 70 टक्क्यांवर पोहोचले आहे. देशाच्या राजकारणात भ्रष्टाचार, राजकीय अस्थिरता आणि लष्कराचा अवाजवी हस्तक्षेप यामुळे त्यांची अवस्था बिकट होते आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या अहवालानुसार, ऑगस्ट 2022 पर्यंत पाकिस्तानचे एकूण कर्ज आणि दायित्वे 59.7 लाख कोटी पाकिस्तानी रुपये होती. हे 11.9 लाख कोटी रुपये आहे, म्हणजे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 25 टक्के अधिक.


परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने घसरण 


2022 मध्ये पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानची परकीय चलन साठा 16 अब्ज डॉलर होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात ते 10 अब्ज डॉलरवर पोहोचले. त्याच वेळी, ऑगस्टमध्ये, पाकिस्तानचा परकीय चलन साठा मोठ्या घसरणीसह 7.83 अब्ज डॉलरवर आला. 2019 नंतर पाकिस्तानमधील परकीय चलनाची ही सर्वात कमी पातळी आहे. मात्र ऑगस्टनंतर काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, 10 डिसेंबर रोजी पाकिस्तानचे परकीय चलन 18.56 अब्ज अमेरिकन डॉलर होते. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत घट झाल्याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानी अर्थ मंत्रालय सुमारे 4 महिने पाकिस्तानी मिशनला पैसे देऊ शकले नाही.


पाकिस्तान एक डॉलरसाठी 224 रुपये मोजतो 


पाकिस्तानी रुपयाचे डॉलरच्या तुलनेत लक्षणीय अवमूल्यन झाले आहे. सध्या 1 अमेरिकन डॉलर खरेदी करण्यासाठी पाकिस्तानला 224 पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागतात. पाकिस्तानी चलनाच्या घसरणीचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होत आहे.


महागाई दर 23.8 टक्क्यांवर पोहोचला


पाकिस्तानचा आर्थिक विकास जवळपास थांबला आहे. जागतिक बँकेने आपल्या एका अहवालात 2023 या आर्थिक वर्षात पाकिस्तानचा जीडीपी केवळ 2 टक्क्यांच्या वेगाने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांत पाकिस्तानातील 90 लाख लोक गरिबीच्या खाईत जातील असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. सर्वसामान्यांना लागणाऱ्या वस्तू खूप महाग झाल्या आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये, पाकिस्तानमध्ये चलनवाढीचा दर 23.8 टक्क्यांवर पोहोचला.


233 रुपये प्रति लिटर पेट्रोल


पाकिस्तानात इंधनाचे दर भडकले आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 233.91 रुपये प्रति लिटर, डिझेलची किंमत 244.44 रुपये प्रति लीटर, केरोसीनची किंमत 199.40 रुपये प्रति लिटर आणि लाईट डिझेलची किंमत 191.75 रुपये प्रति लिटर आहे.