Ivana Trump Passes Away : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प (Ivana Trump) यांचं न्यूयॉर्क शहरात निधन झालं. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इव्हाना यांना श्रद्धांजली वाहिली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, इव्हाना ट्रम्प एक अद्भुत आणि सुंदर महिला होती. जी एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी जीवन जगली. इव्हाना यांच्या निधनामुळे ट्रम्प कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केलं की, त्यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे गुरुवारी वयाच्या 73 व्या वर्षी न्यूयॉर्क शहरात निधन झालं.


न्यूयॉर्क शहरात निधन


डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'तुम्हा सर्वांना कळवताना मला अतिशय दु:ख होत आहे की, इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झालं आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या ती प्रेरणास्थानी होती. ती एक सुंदर होतीच पण तितकीच प्रेरणादायी होती. इव्हाना अनेकांसाठी प्रेरणा ठरली. इव्हाना ट्रम्प यांचा त्यांची तीन मुलं डोनाल्ड ज्युनियर, इवांका आणि एरिक यांना खूप अभिमान आहे. इव्हाना ट्रम्प या एक मॉडेल होत्या, ज्यांनी 1977 मध्ये डोनाल्ड ट्रम्पशी लग्न केलं होतं. 


डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन विवाह


डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना ट्रम्प, 80 च्या दशकात न्यूयॉर्क शहरातील सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 1993 मध्ये अभिनेत्री मार्ला मॅपल्सशी लग्न केलं. पण मॅपल्स यांच्यासोबतचं ट्रम्प यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि 1999 मध्ये त्यांनी मारला मॅपल्स यांना घटस्फोट दिला, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2005 मध्ये मेलानिया ट्रम्प यांच्याशी लग्न केलं.