Israel Palestine  Hamas :  इस्रायलवर (Israel) आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्याने पॅलेस्टाईनमधील (Palestine) हमास (Hamas) ही कट्टरतावादी संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हमासच्या हल्ल्याने खवळलेल्या इस्रायलने संघटनेचा एकही दहशतवादी जिवंत सोडणार नसल्याचे म्हटले आहे. इस्रायलकडून सुरू असलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत गाझा बेचिराख होत आहे. हमास ही संघटना पॅलेस्टाईन नव्हे तर इस्रायलने जन्माला घातली आणि आत हेच अपत्य इस्रायलला डोईजड होत आहे. 


हमासचा निर्माता दुसरा कोणी नसून इस्रायल आणि तिची गुप्तचर संस्था मोसाद आहे. पॅलेस्टाईनवर पूर्णपणे ताबा मिळवण्यासाठी आणि पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफात यांनी निर्माण केलेल्या पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी हमासची निर्मिती करण्यात आली. त्यासाठीचा पैसा आणि शस्त्रे  ही मोसादने पुरवली होती. पण आता हाच हमास इस्रायलविरोधात आक्रमक झाला आहे.


अफगाणिस्तानमधून सोव्हिएत रशियाच्या पाठिंब्यावर असलेल्या  कम्युनिस्ट विचारांच्या मोहम्मद नजीबुल्ला यांचे सरकार हटवण्यासाठी आणि अफगाणिस्तानमधून सोव्हिएतच्या फौजा माघारी घालवण्यासाठी अमेरिकेने ज्या प्रमाणे तालिबान उभारली आणि याच तालिबान, अल-कायदा सारखी दहशतवादी संघटना अमेरिकेवर उलटली. तशाच काहीसा प्रकार इस्रायलबाबत झाला आहे. 


इस्रायल आणि अरब देशात युद्ध 


1967 मध्ये इस्रायल आणि अरब देशांमध्ये सहा दिवसांचे युद्ध झाले होते. या सहा दिवसांच्या युद्धात 20 हजार अरबी नागरीक, सैन्य  ठार झाले होते. तर, इस्त्रायलची फार कमी जीवितहानी झाली. या युद्धाला इस्रायलने तोंड फोडले होते. 


या हल्ल्यामागे कारण देताना इस्रायलने म्हटले होते की, इजिप्तकडून हल्ला होऊ शकतो आणि त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हवाई हल्ले सुरू केले. पण युद्ध संपल्यावर इस्रायलने इजिप्तकडून गाझा पट्टी आणि सिनाई द्वीपकल्प, जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि जेरुसलेम आणि सीरियाकडून गोलान हाइट्स जिंकले.


इथूनच सगळा डाव सुरू होतो. सीरिया, जॉर्डन आणि इजिप्तच्या ताब्यात असलेला आणि इस्रायलने स्वत: कडे घेतलेला भूभाग हा पॅलेस्टाईनचा होता आणि तेथे मुस्लिमांची मोठी लोकसंख्या होती. पण आता सत्ता इस्रायलच्या हातात असल्याने त्यांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला.


मुस्लिम नेत्याला प्यादे बनवण्यात आले


त्यासाठी त्यांनी पॅलेस्टाईनमधील मुस्लिम ब्रदरहूडचा नेता शेख अहमद यासीन याला आपला मोहरा बनवला. मुस्लिम ब्रदरहुड ही इजिप्तमध्ये स्थापन झालेली एक सुन्नी इस्लामिक संघटना होती, ज्याची स्थापना 1928 मध्ये झाली होती. त्याचा विस्तार संपूर्ण अरब देशांमध्ये झाला, जिथे वेगवेगळे लोक इस्लामसाठी काम करत होते.


पॅलेस्टाईनमधील या कामाची जबाबदारी शेख अहमद यासीनवर होती. शेख अहमद यासीनही विस्थापित झाला आणि नकबाच्या वेळी गाझा पट्टीत पोहोचला. वयाच्या 12 व्या वर्षी एका अपघातात त्यांना पाठीच्या कण्याला दुखापत झाली, त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते आणि ते नेहमी व्हील चेअरवरच राहिले.


तो डोळ्यांनीही पाहू शकत नव्हता, परंतु गाझामधील लोकांनी त्याचे ऐकले. तो एक इस्लामिक विद्वान बनला होता जो धार्मिक व्याख्याने देत असे आणि पॅलेस्टाईनच्या लोकांच्या कल्याणाविषयी बोलत असे.


इस्रायलने शेख अहमद यासीनला आपल्या बाजूने वळवले आणि मोहरा तयार केला. अहमद यासीनला खूप पैसे दिले जेणेकरून अहमद यासीन एक शाळा, हॉस्पिटल, मशीद बांधू शकेल आणि गाझामधील गरीबांना मदत करू शकेल. जेणेकरून गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांनी त्यांना आपला नेता म्हणून स्वीकारले आणि ते स्वतः इस्रायलच्या सूचनांचे पालन करत राहतील, ज्यामुळे गाझावरील इस्रायलचे नियंत्रण सुनिश्चित होईल आणि शांतता राखली जाईल.


इस्रायलला युद्धावर खर्च झालेल्या पैशांपेक्षा कमी खर्चात अहमद यासिनला आपल्या तालावर नाचवता आले असते. ही संपूर्ण योजना इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादची होती.


इस्रायलवर पुन्हा हल्ला


तिसऱ्या अरब युद्धानंतर सर्व काही ठीक चालले होते. गाझा पट्टी इस्रायलच्या ताब्यात होती आणि त्याचाच माणूस अहमद यासीन मुस्लिमांचा नेता राहिला. पण वेस्ट बँकमध्ये इस्रायलविरुद्धची आग अजूनही धगधगत होती. ही आग तेवत ठेवणाऱ्या संघटनेचे नाव पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन होते.


2 जून 1964 रोजी स्थापन झालेल्या या संघटनेचे उद्दिष्ट अरब गटांची एकता आणि पॅलेस्टाईनचे स्वातंत्र्य होते, ज्याला अरब लीगने देखील मान्यता दिली होती. इजिप्त, लेबनॉन, जॉर्डन, सीरिया, सौदी अरेबिया आणि इराक या देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली. 


यासर अराफात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेने 6 ऑक्टोबर 1973 रोजी इस्रायलवर हल्ला केला. तिन्ही युद्धांप्रमाणेच अरब देशांनी इस्रायलविरुद्ध पीएलओची बाजू घेतली. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या युद्धाला चौथे अरब-इस्रायल युद्ध म्हटले जाते. यावेळीही इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने युद्ध जिंकले.


इस्त्रायल प्रत्येक वेळी जिंकत असला तरी आर्थिकदृष्ट्या खूप मोठे नुकसान होत होते. अशा परिस्थितीत त्यांनी अमेरिकेच्या मदतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत अमेरिकेत जिमी कार्टर राष्ट्राध्यक्ष झाले होते आणि इजिप्तमधील सत्ताही अन्वर सादात यांच्या हातात आली होती.


अन्वर सादात यांना देखील समजले की पॅलेस्टाईनमुळे सर्वात जास्त नुकसान आपल्याच देश इजिप्तला होत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडत आहे. अशा स्थितीत जिमी कार्टर यांच्या पुढाकाराने अन्वर सादात यांनी इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बेगिन यांच्याशी चर्चा करण्याचे मान्य केले.


इस्रायल आणि इजिप्तमध्ये शांतता करार


इजिप्त आणि इस्रायलमध्ये झालेल्या चर्चेनंतर इस्त्रायल आणि इजिप्त या दोन देशांमध्ये शांतता करार झाला. त्यामुळे वेस्ट बँकमध्ये स्थापन झालेली पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन एकटी पडली. आता इजिप्त त्याला मदत करायला तयार नव्हता. 


यामुळे मोसादने आपल्या गाझा पट्टीतील शेख अहमद यासीन या व्यक्तीला अधिक पैसे देण्यास सुरुवात केली. इस्रायलच्या सांगण्यावरून शेख अहमद यासीनने गाझा पट्टीत संघटित पद्धतीने आपली सत्ता चालवण्यासाठी एक संघटना स्थापन केली. मुजम्मा-अल-इस्लामिया नाव दिले. गाझा पट्टीत राहणाऱ्या पॅलेस्टिनींना इस्रायली पैशाने मदत करणे हा त्याचा उद्देश होता.


मात्र, इस्रायलने केवळ पैशांचीच मदत केली नाही तर शस्त्रेही पाठवली. जेणेकरून काही तुरळक चकमकी झाल्या किंवा पीएलओचा हस्तक्षेप वाढला तर मुजमा-अल-इस्लामिया स्वतःच त्याचा सामना करू शकेल.


1979 मध्ये इस्रायलने स्वतः मुजम्म-अल-इस्लामियाला मान्यता दिली आणि म्हटले की ही संघटना गाझा पट्टीत मशिदी बांधू शकते, शाळा-हॉस्पिटल बांधू शकते, ग्रंथालये बांधू शकते आणि गाझामध्ये इस्लामिक विद्यापीठही बांधू शकते. एकंदरीत, इस्रायलने मुजम्म-अल-इस्लामियाला निर्विवादपणे पाठिंबा दिला.


पहिला विद्रोह


विद्रोहाची पहिली ठिणगी पडल्यानंतर पॅलेस्टाईनमधील वातावरण ढवळून निघाले. गाझामधील जबलिया नावाच्या ठिकाणी एक निर्वासित छावणी होती, ज्यामध्ये पॅलेस्टिनी लोक राहत होते. हे इस्रायलच्या सीमेला लागून असलेले ठिकाण होते. 9 डिसेंबर 1987 रोजी इस्रायली सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली.


या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तीन निर्वासित आणि तीन जबलिया कॅम्पमधील होते. इस्रायली सैनिकांनी जाणूनबुजून हल्ला केल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केला आहे. याच्या निषेधार्थ संपूर्ण पॅलेस्टाईनमध्ये निदर्शने सुरू झाली.


पॅलेस्टिनींनी मोठ्या प्रमाणात काठ्या आणि दगडांनी इस्रायली सैनिकांवर हल्ले केले. त्यावेळी पॅलेस्टाईनकडे शस्त्रांच्या नावाखाली हे असायचे. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हा विरोध पहिला इंतिफादा अर्थात विद्रोह म्हणून ओळखला जातो.


शेख अहमद यासीनच्या माध्यमातून आतापर्यंत गाझा पट्टीवर कब्जा करणाऱ्या इस्रायलला आता तिथेही विरोध होत आहे. उर्वरित वेस्ट बँकमध्ये पीएलओ होती, जी इस्रायलविरुद्ध युद्ध करत होती.


आता इस्रायलला पुन्हा गाझा पट्टी आणि वेस्ट बँक या दोन्ही ठिकाणी लढावे लागले. पण हा सशस्त्र निषेध नसल्यामुळे इस्रायलला उघडपणे शस्त्रे वापरता आली नाहीत. असे केले असते तर प्रकरण आंतरराष्ट्रीय बनले असते. अशा स्थितीत इस्रायलने पुन्हा शेख अहमद यासीनची मदत घेतली.


आतापर्यंत इस्रायलने शेख अहमद यासीनने स्थापन केलेल्या मुजम्म-अल-इस्लामिया या संघटनेला आधीच मान्यता दिली होती, त्यामुळे याद्वारे विद्रोह संपवण्याचा प्रयत्न केला. शेख अहमद यासीन एक अतिरेकी संघटना तयार करेल, ती संघटना इस्रायलवर हल्ला करेल आणि बदल्यात इस्रायल गाझामध्ये नव्हे तर वेस्ट बँकवर हल्ला करेल आणि पीएलओला पूर्णपणे नष्ट करेल आणि त्याद्वारे संपूर्ण पॅलेस्टाईन ताब्यात घेईल अशी योजना होती.


शेख अहमद यासीन यांनी संघटना स्थापन केली


शेख अहमद यासीन यांना इस्रायलचे हे म्हणणे टाळता आले नाही. त्याने मुजम्मा-अल-इस्लामिया ही दहशतवादी संघटना स्थापन केली, ज्याला त्याने हरकत अल-मुकावामा अल-इस्लामिया असे नाव दिले. थोडक्यात त्याला हमास म्हणतात. शेख अहमद यासीन याने स्वतःला या संघटनेचा धार्मिक नेता बनवले, तर लढ्याची कमान अब्देल अझीझ अली अब्दुल मजीद अल रंतीसी यांच्याकडे होती, ज्यांना पॅलेस्टाईनचा सिंह म्हणूनही ओळखले जाते.


हमासने हल्ला केला


इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हमासने पहिला हल्ला 16 फेब्रुवारी 1989 आणि दुसरा हल्ला 3 मे 1989 रोजी केला होता. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हमासने इस्रायली सैनिकांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. इस्रायललाही हेच हवे होते. पश्चिम किनाऱ्यातील पीएलओचा नायनाट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हवाई हल्ले सुरू केले.


पीएलओचे लोकही गाझा पट्टीत होते. त्यांना संपवण्यासाठी इस्रायलने हमासची मदत घेतली. याचा परिणाम असा झाला की पीएलओ इतका कमकुवत झाला की फक्त गाझामध्ये मजबूत असलेल्या हमासने वेस्ट बँकमध्येही आपली ताकद वाढवली. मग ते इतके बलवान झाले की पुढे त्यांनी ना मोसादचे ऐकले ना इस्रायलचे. आणि आज इस्रायलचा शत्रू पीएलओ किंवा पॅलेस्टाईन किंवा वेस्ट बँक नाही, तर तोच हमास आहे, जो त्याने स्वतः तयार केला आहे.


आता इस्रायलचे समर्थन करणारे लोक या साऱ्या गोष्टीला षड्यंत्र, केवळ कल्पना,म्हणू शकतात, परंतु कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. 


इस्रायलने हमाससोबत केलेल्या करारात अवनर कोहेनचाही सहभाग होता. कोहेन, ट्युनिशियामध्ये जन्मलेले, 1970 आणि 1980 च्या दशकात एक इस्रायली अधिकारी होते, ते गाझा पट्टीमध्ये तैनात होते. 2009 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, "मला याचा खेद वाटतो. हमास ही इस्रायलने निर्माण केलेली संघटना आहे. जेव्हा इस्रायल पीएलओ आणि यासर अराफात यांच्याशी लढत होते, तेव्हा त्यांनी शेख अहमद यासीनला या लढ्यात मदत केली आणि शेख अहमद यासीनला हमासची स्थापना करतानाही मदत केली.


एव्हनर कोहेन म्हणाले होते, "गाझा पट्टीत तैनात असतानाही मी माझ्या अधिकाऱ्यांना फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण थांबवण्यास सांगितले होते. या श्वापदाला तोडण्यासाठी आपण मार्ग काढला पाहिजे, परंतु अधिकाऱ्यांनी माझे अजिबात ऐकले नाही आणि त्याचा परिणाम, हमास आज आपल्या समोर आहे.


अँड्र्यू हिगिन्स मुलाखत


अँड्र्यू हिगिन्स हा देखील असेच एक अधिकारी आहेत. 1980 च्या दशकात इस्रायली लष्कराच्यावतीने गाझामध्ये तैनात होते. 2009 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत अँड्र्यू हिगिन्स यांनी सांगितले की, जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटते की चूक झाली आहे. इस्रायलनेच इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ गाझाच्या उभारणीत मदत केली. हे विद्यापीठ दहशतवादाचा अड्डा झाला. 


ते पुढे म्हणाले, "2008-09 मध्ये जेव्हा इस्रायलने चढाई केली तेव्हा पहिला हल्ला याच विद्यापीठावर झाला होता. हमास हा इस्रायलने तयार केलेला तालिबान असल्याचेही त्यांनी म्हटले. 


गाझामधील इस्रायलचे लष्करी जनरल काय म्हणाले?


1980 च्या दशकाच्या सुरुवातीला गाझामध्ये इस्रायली लष्करी जनरल ब्रिगेडियर जनरल यित्झाक सेगेव्ह यांची नियु्क्ती होती. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, "पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि यासर अराफात यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष-डाव्या विचारांच्या फतह पक्षाचा प्रतिकार करण्यासाठी मी पॅलेस्टिनी इस्लामिक मूव्हमेंट हमासला पैसे दिले. हा पैसा इस्रायली करदात्यांच्या मालकीचा होता, ज्याचा वापर हमासने ज्या इस्रायली लोकांचा होता त्यांना मारण्यासाठी केला होता.


ब्रिगेडियर जनरल येझटक सेगेव यांनी जड अंतःकरणाने स्वीकारले होते की इस्रायल सरकारने त्यांना पैसे दिले होते आणि लष्कराने ते पैसे मशिदीला दिले. त्याच वेळी, 1980 च्या दशकात गाझामध्ये तैनात असलेल्या इस्रायली सैन्याचे अरब तज्ञ डेव्हिड हॅचमन यांनी देखील सांगितले की जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटते की चूक झाली आहे. 


जगभरात पॅलेस्टाईन चळवळीचे चेहरा झालेले पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख आणि फतह पार्टीचे संस्थापक यासर अराफत यांनी देखील अनेकदा हमासचा निर्माता हा पॅलेस्टाईन नसून इस्रायलचे पाठबळ असल्याचे सांगत असे.