Israel Palestine Conflict : हमास आणि इस्रायल मधील युद्धाला 21 दिवस उलटून गेले आहे. आज 22 व्या दिवशीही हा संघर्ष कायम आहे. दोन्ही बाजूंचे आतापर्यंत 8,500 हून नागरिक मारले गेले आहेत. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली लष्कर गाझा पट्टीमध्ये घुसलं असून मोठ्या हल्ल्याच्या आधी छापेमारी करत आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हमासच्या विरोधात लवकरच जमिनीवर मोहीम सुरू केली जाईल असे म्हटले आहे.


इस्रायलकडून गाझा पट्टीत तीव्रतेने हल्ले सुरुच


गाझा पट्टीत इस्रायलने अतिशय तीव्र हल्ले सुरु केले आहेत. शुक्रवारी रात्री इस्रायलकडून हवाई हल्ले करण्यात आले. गाझातील नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, काल रात्री इस्रायलने केलेले हल्ले युद्धाच्या मागील 21 दिवपसांपासून सुरु असलेल्या युद्धापेक्षाही अधिक पटीने घातक होते.






150 भूमिगत ठिकाणांना लक्ष्य


इस्रायलने गाझा पट्टी हमासच्या जमिनी खालील छुप्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. इस्रायल लष्कराने दावा केला आहे की, IDF ने गाझा पट्टीच्या उत्तरेकडील 150 अंडरग्राऊंड ठिकाणांना लक्ष्य करत हल्ला केला आहे. यामध्ये अनेक सुरुंग आणि तळांचा समावेश आहे. या भूमिगत ठिकाणांवर हमासकडून इस्रायलवरील हल्ल्याचं नियोजन करण्यात येत होतं.


गाझातील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या खाली हमासचं मुख्यालय


इस्रायलने खुलासा केला की, हमासचे मुख्यालय गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या खाली भूमिगत स्वरुपात आहे. हे युद्ध गुन्हा आहे. हमासला पॅलेस्टिनी नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही, असंही इस्रायलने म्हटलं आहे. हमासला फक्त इस्रायलचा नाश करायचा आहे, असं इस्रायलने म्हटलं आहे.


वीजपुरवठा, इंटरनेट आणि दळणवळण खंडित


इस्रायलने हमासच्या विरोधात संपूर्ण ग्राउंड मोहीम सुरू करण्यापूर्वी गाझामध्ये छापे टाकले आहेत, ज्यात रणगाड्यांचा वापर केला जात आहे. उत्तर गाझामध्ये इस्रायलने शुक्रवारी जोरदार हल्ला केला. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, इस्रायलने शुक्रवारी संध्याकाळी उत्तर गाझामध्ये केलेल्या तीव्र हल्ल्यांनी आजूबाजूचा हादरला. संपूर्ण परिसरात वीजपुरवठा, इंटरनेट आणि दळणवळण खंडित करण्यात आल्याचा दावा हमासने केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Israel Hamas War : हमास ओलिस ठेवलेल्या इस्रायलींना सोडण्यास तयार, पण ठेवली 'ही' अट