Israel Hamas War : हमास (Hamas) ने इस्रायल (Israel) वर हल्ला चढवला, त्यानंतर इस्रायलने युद्धाचं (Israel Palestine War) रणशिंग फुकलं आणि गाझामध्ये (Gaza Strip) होत्याच नव्हतं झालं. गेल्या 12 दिवसांपासून असलेल्या तीव्र संघर्षामध्ये इस्रायल पहिल्यांदा नरमला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) जो बायडन (Joe Biden) यांच्या इस्रायल दौऱ्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान (Israel Prime Minister) बेंजामिन नेत्यानाहू (Benjamin Netanyahu) यांनी गाझातील जनतेसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाझामध्ये पहिल्यांदा मानवतावादी मदत पाठवण्यास परवानगी दिली आहे. इस्रायलने इजिप्तला गाझापर्यंत मानवतावादी मदत पोहोचवण्याची परवानगी दिली आहे.


इजिप्तला गाझापर्यंत मानवतावादी मदत पाठवणार


हमासवरील हल्ला करत इतर बाजूंनीही कोंडी करण्यासाठी इस्रायलने गाझापट्टीतील अन्नपुरवठा बंद केला होता. गाझामध्ये इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले असून अनेकांना कायमच अपंगत्व आलं आहे. एक दिवसापूर्वी गाझा येथील रुग्णालयात झालेल्या अज्ञात हल्ल्यात 500 हून अधिक लोक मारले गेले. रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यासाठी हमास इस्रायलला जबाबदार धरत आहे, तर इस्रायलने सर्व आरोप फेटाळत या हल्ल्यामागे हमासचा हात असल्याचं म्हटलं आहे. आता युद्धात पहिल्यांदाच इस्रायलने इजिप्तला गाझाला मानवतावादी मदत पोहोचवण्याची परवानगी दिली आहे.


बायडन यांच्या प्रयत्नांना यश


इस्रायल आणि हमास यांच्यातील वाढता तणाव कमी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी इस्रायल दौरा केला. बायडन यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसत आहे. इस्रायलने बुधवारी सांगितलं की, इजिप्तला गाझा पट्टीला मानवतावादी मदत पोहोचवण्याची परवानगी देईल. दरम्यान, ही मदत मर्यादित स्वरुपात असेल. इस्रायलच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितलं आहे. इस्रायल पंतप्रधानांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा हमासपर्यंत पोहोचला नाही तरच, सामान्य नागरिकांसाठीची ही मदत थांबणार नाही. ही मदत कधीपासून सुरू होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


गाझाकडून हमासला मदत मिळायला नको : नेतन्याहू


एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रफाह सीमेवरून गाझाला अत्यावश्यक मदत पोहोचवण्याची इजिप्तची क्षमता मर्यादित आहे. इजिप्तने म्हटले आहे की, इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे सीमा भागात नुकसान झाले आहे. गाझामधील सीमा चौक्यांवर नियंत्रण ठेवणार्‍या इस्रायलने सांगितले की, ते आपल्या प्रदेशातून पुरवठा होऊ देणार नाहीत. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसला गाझामध्ये अपहृत इस्रायलींना भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच त्यांनी हमासला कोणत्याही परिस्थितीत मदत करू नये, असंही म्हटलं आहे. इस्रायलने केवळ मानवतावादी कारणांसाठी इजिप्तला गाझाला मानवतावादी मदत पोहोचवण्याची परवानगी दिली आहे.