Israel Hamas War :  इस्रायल आणि हमास (Hamas) यांच्यात गेल्या 13 दिवसांपासून युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. हमासने सुरू केलेल्या युद्धाला इस्रायलने चोख प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून गाझा पट्टीवर जोरदार हल्ले सुरू आहेत.  गाझा येथील अल अहली हॉस्पिटलवर हल्ला झाला. यामध्ये 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा आपण केला नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे. तर, हमासने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. रुग्णालयावरील हा हल्ला इस्रायलने केला नसल्याचा पुरावा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला देणार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. तर, अमेरिकेने हमासवर निर्बंध लादले आहेत.  


इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यासोबतच अमेरिकेने हमासशी संबंधित 9 सदस्य आणि एका युनिटवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या वित्त विभागाने बुधवारी नऊ लोकांवर आणि इराण समर्थित पॅलेस्टिनी गट हमासशी संबंधित एका घटकावर दहशतवादाशी संबंधित निर्बंध लादले  आहेत. अमेरिकेने एका निवेदनात म्हटले आहे की, लहान मुलांसह इस्रायली नागरिकांची क्रूर हत्या झाल्यानंतर अमेरिकेकडून हमासला आर्थिक मदत करणारे आणि त्यांचे सूत्रधार यांची कोंडी करण्यासाठी निर्णायक कारवाईसाठी पावले उचलली जात आहेत. 


हमासकडून 31 अमेरिकन नागरिकांची हत्या; बायडन यांचा संताप


इस्त्रायल दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, मला आज एका साध्या कारणासाठी येथे यायचे होते. अमेरिका कुठे उभी आहे हे इस्रायलच्या लोकांना आणि जगभरातील लोकांना कळावे अशी माझी इच्छा आहे. हमास या दहशतवादी गटाने 1300 हून अधिक लोकांची "हत्या" केली होती, "आणि ही अतिशयोक्ती नाही, फक्त हत्या केली. यात 31 अमेरिकन लोकांचा समावेश आहे. त्यांनी लहान मुलांसह अनेकांना ओलीस ठेवले आहे.


इराणकडून इस्रायलवर निर्बंध घालण्याची मागणी 


दुसरीकडे इराणने मुस्लिम देशांना इस्रायलवर निर्बंध लादण्याचे आवाहन केले आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेच्या (ओआयसी) आपत्कालीन बैठकीदरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियान यांनी सदस्य देशांना इस्रायलवर तेल निर्बंधासह इतर निर्बंध लादण्याची सूचना केली आहे. जेद्दाहमध्ये त्यांनी अल-अहली अरब रुग्णालयावरील प्राणघातक हल्ल्यानंतर गाझामधील संभाव्य युद्ध गुन्ह्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी सर्व इस्रायली राजदूतांची हकालपट्टी आणि इस्लामिक वकीलांचा एक गट स्थापन करण्याचे आवाहन केले.


रुग्णालय रिकामे करण्याचा इशारा दिला


'अल जझीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर, जेरुसलेममधील चर्चच्या प्रमुखांशी बोलताना आर्चबिशप होसम नौम यांनी सांगितले की अल-अहली अरब हॉस्पिटलला फोनद्वारे शनिवार, रविवार आणि सोमवारी रिकामे करण्याचा इशारा मिळाला होता. मात्र, हे इशारे कोणी दिले हे त्यांनी सांगितले नाही. नऊम म्हणाले की, आम्ही निर्णय घेणारे लष्करी लोक नाही, आम्ही विश्लेषण करणारे पत्रकार नाही, आम्ही निर्णय घेणारे राजकारणी नाही, आम्ही एवढेच म्हणू शकतो की हा गुन्हा आहे, नरसंहार आहे.