Israel Hamas War : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) दरम्यान सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 4200 हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले आहे. इस्रायलवर हमासने हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर देत कारवाई सुरू केली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या 10 व्या दिवशीही हवाई हल्ले, बॉम्बफेक, रॉकेट आणि सायरनचे आवाज इस्रायल आणि गाझा पट्टीत आजही ऐकू आले. या युद्धात आतापर्यंत 4200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून दोन्ही बाजूंकडून धमक्या दिल्या जात असल्याने हल्ले आणि मृत्यूची संख्या आणखी वाढणार आहे. दरम्यान, गाझामधील (Gaza Strip) लाखो लोकांसमोरील पाणी, अन्न, औषध आणि वीज या मूलभूत गरजांचे संकट अधिक गडद झाले आहे.


इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन सोमवारी (16 ऑक्टोबर) पुन्हा एकदा तेल अवीवमध्ये दाखल झाले. ब्लिंकन हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेणार आहेत. ही भेट अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे. 


बीबीसीच्या वृत्तानुसार, रात्री नऊच्या सुमारास हमासने दावा केला की त्यांनी इस्रायलमधील तेल अवीव आणि जेरुसलेमवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. हे हल्ले अल कासिम ग्रुपने केले होते. एका निवेदनात असे म्हटले आहे की हे हल्ले सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याच्या प्रत्युत्तरात होते. तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये उपस्थित पत्रकारांनी परिसरात सतत सायरनचे आवाज येत असल्याचे सांगितले. 


किती लोकांना जीव गमवावा लागला?


'अल जझीरा'च्या वृत्तानुसार,  इस्रायलमध्ये झालेल्या हल्ल्यात सुमारे 1400 लोकांचा मृत्यू झाला असून 3500 लोक जखमी झाले आहेत. तर गाझामध्ये 2800 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि सुमारे 11 हजार लोक जखमी झाले आहेत. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायलच्या हल्ल्यामुळे 1000 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.


'बीबीसी'च्या वृत्तानुसार इस्रायलच्या हवाई दलाने हमासचे जनरल इंटेलिजन्स चीफ हवाई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला आहे. 


अँटोनी ब्लिंकन इस्रायल दौऱ्यावर


दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलच्या दौऱ्यावर आले आहेत. आठवडाभरातील हा त्यांचा दुसरा दौरा आहे.  लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील इस्रायलला भेट देणार असल्याचे वृत्त आहे.


ब्लिंकन यांनी तेल अवीवमध्ये अधिकार्‍यांची भेट घेत असताना नागरिकांना मानवतावादी मदत देण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतरांशी केलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. हमासने ओलिस ठेवलेल्या सुमारे 200 लोकांना सोडवण्याच्या प्रयत्नात मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


पुतीन यांनी अनेक देशांशी संपर्क साधला


जो बायडेन यांच्या इस्रायलच्या संभाव्य भेटीपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इस्रायल, इराण, इजिप्त, सीरिया आणि पॅलेस्टाईनच्या राष्ट्रप्रमुखांशी फोनवर चर्चा केली. पुतिन यांनी सांगितले की, "नागरिकांविरूद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार अस्वीकार्य आहे. रशियाने त्वरित युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :