Israel Hamas War : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत आहे. हमासने (Hamas) केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलने मोठी आक्रमकता दाखवली आहे. हमासच्या हल्लेखोरांना मारताना इस्रायलच्या कारवाईत निष्पापही भरडले जात आहेत. गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांची संख्या 10 हजारांहून अधिक झाली आहे.
'अल जझिरा' या वृत्तसंस्थेने पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात 10 हजार 22 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4104 बालकांचा समावेश आहे. त्याशिवाय अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
या वृत्तानुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही किमान 2,000 लोक दबले गेले आहेत, ज्यांना अवजड उपकरणे आणि यंत्रसामग्री नसल्यामुळे बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या घेरावामुळे लोकांना इंधन, अन्न आणि वीज यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत.
हिजबुल्लाहकडून हल्ले सुरू
इस्रायल-हमासच्या युद्धाचे परिणाम आता लेबनॉनमध्येही जाणवू लागले आहेत. हिजबुल्लाह कट्टरतावादी संघटनेकडून इस्रायलवर सतत रणगाड्यांद्वारे हल्ले करत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनने लेबनॉनमधून काही ब्रिटिश दूतावासातील कर्मचाऱ्यांना तात्पुरते परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
इंधनाचा तुटवडा...
कमी इंधन पुरवठ्यामुळे गाझातील 35 रुग्णालयांपैकी अनेक रुग्णालये ठप्प झाली आहेत. इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत 25,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, दरम्यान, गाझामधून 15 लाखांहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 1,400 हून अधिक लोक मारले गेले होते. यानंतर इस्रायलने गाझा येथील हमासवर जोरदार हल्ले सुरू केले. हमासने 200 हून अधिक लोकांना इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे.
इस्रायलकडून निर्वासित छावणीवर हल्ले
इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून गाझा पट्टीतील दोन निर्वासित छावणींवर हल्ले करण्यात आल्याचे वृत्त होते. या दोन्ही हल्ल्यात मिळून जवळपास 100 जण ठार झाल्याचे वृत्त होते. तर, शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी गाझा पट्टीतील अल-मगाझी निर्वासित छावणीत स्फोट झाल्याचं वृत्त होते. या निर्वासित छावणीतील एका रहिवाशाने सांगितले की, ते घरात बसले असताना हा स्फोट झाला. त्यानंतर अचानक त्यांना स्फोटाचा आवाज आला. स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण परिसर हादरला. इस्रायली लष्कराने या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने सांगितले की, ते स्फोटाच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा तपास करत आहेत.