Israel attack : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमधील संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये. दोन्ही देशांकडून एकमेकांकडून बॉम्ब आणि मिसाईल हल्ले सुरुच आहेत. दरम्यान, आता इराणची राजधानी असलेल्या तेहराणमध्ये गिला जवळ इस्रायलने हल्ला केलाय. या हल्ल्यात एका अणू शास्त्रज्ञाचा मृत्यू झालाय. इस्रायल मीडिया Kan News च्या माहितीनुसार, इस्रायली अधिकाऱ्याने दावा केलाय की, हा हल्ला इस्रायच्या सैन्याने (IDF) केला आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या स्फोटाचा उद्देश ईरानच्या अणू कार्यक्रमाशी संबंधित एका वरिष्ठ शास्त्रज्ञाला लक्ष्य करणे हा होता. प्राथमिक माहितीनुसार, तो शास्त्रज्ञ या हल्ल्यात ठार झाला आहे. मात्र, इराण सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप आलेले नाही. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील आधीपासूनच तणावपूर्ण असलेली परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
इराणचे अध्यक्ष मसूद पेज़ेश्कियन यांनी इस्रायली हल्ल्यांबाबत तीव्र इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, शांततेचा एकमेव मार्ग म्हणजे इस्रायलने तात्काळ आणि कोणतीही अट न घालता आपले हल्ले थांबवावेत. पेज़ेश्कियन यांनी स्पष्ट केले की, जर इस्रायलकडून हल्ले सुरूच राहिले, तर इराणला आणखी कठोर प्रत्युत्तर द्यावे लागेल. त्याचबरोबर, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इस्रायली हल्ले सुरू असताना अमेरिका किंवा कोणत्याही इतर देशासोबत यासंबंधी कोणतीही चर्चा होणार नाही.
इस्रायली हल्ले सुरू असताना कोणतीही चर्चा नाही
अब्बास अराघची यांनी सांगितले की, आम्हाला सध्याच्या परिस्थितीत कोणाशीही, विशेषतः अमेरिकेशी कोणतीही चर्चा करायची नाही. उलट अमेरिका आमच्याशी संपर्क करत आहे. अमेरिकेने अनेकदा आणि गंभीर स्तरावर चर्चेचा प्रस्ताव दिला आहे, पण आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत झायनिस्ट शासनाचे (इस्रायलचे) हल्ले सुरू आहेत, तोपर्यंत कोणतीही चर्चा किंवा राजनैतिक वाटाघाटी होणार नाहीत.
'इराणला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार'
अराघची म्हणाले की, सध्या इराण आत्मसंरक्षणाच्या अवस्थेत आहे आणि आपले रक्षण करणे हा आमचा हक्क आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा उल्लेख करताना अराघची म्हणाले की, आमचे हल्ले केवळ लष्करी ठिकाणांवर केंद्रित आहेत, सामान्य नागरिक किंवा रुग्णालयांवर नाहीत. जर इस्रायल आमच्या आर्थिक केंद्रांवर हल्ला करेल, तर आम्हीही त्यांच्या आर्थिक संस्थांना लक्ष्य करू.
अमेरिका या हल्ल्यांमध्ये सहभागी : इराण
इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी हेही स्पष्ट केले की, क्षेपणास्त्र क्षमतेसंदर्भात कोणतीही चर्चा होणार नाही. त्यांनी सांगितले की, इराणचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान हे संरक्षणात्मक आहे आणि त्याचा उद्देश कुणावरही आक्रमण करणे नाही. त्यांनी अमेरिकेला इस्रायलचा भागीदार आणि हल्ल्यांत सहकारी असल्याचे सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा हवाला देताना त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी स्वतः कबूल केले आहे की “हो, हे आम्ही केलं”, ज्यावरून स्पष्ट होते की अमेरिका या हल्ल्यांमध्ये थेट सहभागी आहे.
इराणने युरोपीय देशांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र हेही ठामपणे सांगितले की, जोपर्यंत इस्रायल हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा शक्य नाही. अराघची म्हणाले की, इराणला विश्वास आहे की कालांतराने आंतरराष्ट्रीय समुदाय इस्रायलच्या आक्रमकतेपासून दूर राहू लागेल आणि युद्धविरामाची मागणी अधिक तीव्र होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या