मेरठ: नेहमीच दहशवाद आणि सीमेवरील तणाव यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात धुसफूस सुरु असते. मात्र नेहमीच चर्चेसाठी हात पुढे करणाऱ्या भारतासाठी, पाकिस्ताननेही संवेदनशीलता दाखवली आहे.

 

एका भारतीयाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यास पाकिस्तान सरकारने होकार दिला आहे. फाळणीमुळे घर-दार सोडावं लागलेल्या 91 वर्षीय कृष्णा खन्ना यांना, त्यांचं पाकिस्तानमधील घर पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

कृष्णा खन्ना हे आता 91 वर्षांचे झाले आहेत. कृष्णा यांचं संपूर्ण बालपण पाकिस्तानातील उढोके इथं गेलं. त्याच बालपणाची आठवणींमध्ये ते उर्वरीत आयुष्य कंठत आहेत. मात्र शेवटची इच्छा म्हणून जिथे बालपण घालवलं, जिथे वाढलो ते पाकिस्तानातील घर, अंगण पाहता यावं, अशी इच्छा कृष्णा यांची आहे.

 

या इच्छेसाठी ते गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानला जाण्यासाठी त्यांनी अनेकवेळा व्हिजासाठी अर्ज केला. मात्र त्यांना व्हिजा मिळाला नाही. पण अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. पाकिस्तान सरकारने कृष्णा यांना व्हिजा देण्यास मंजुरी दिली आहे. इतकंच नाही तर कृष्णा यांच्यासोबत अन्य तिघांनाही पाकिस्तानात येण्यास परवानगी दिली आहे.

 

फाळणीनंतर घर सोडलं

 

भारत-पाकिस्तान फाळणीअगोदर मोठी दंगल उसळली होती. त्यावेळी कृष्णा यांच्या कुटुंबाने उढोके सोडलं. ते शेखुपुरामध्ये दाखल झाले. या दंगलीदरम्यान अतिशय भयानक असा अनुभव खन्ना कुटुंबाला आला होता.