Iran Hijab Protest : इराणच्या तेहरानमधील कोम प्रांतामध्ये एका बँक मॅनेजनला नोकरी गमवावी लागली, कारण त्याने बँकेमध्ये हिजाब न घातलेल्या एका महिलेला बँकींग सेवा दिली. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे. इराणमध्ये महिलांसाठी हिजाब सक्तीचा कायदा लागू करण्यात आला आहे. याविरोधात मागील अनेक महिन्यांपासून आंदोलने आणि निदर्शने सुरु आहे. महिलांना चेहरा, मान आणि केस झाकणं कायद्यानं सक्तीचे करण्यात आलं आहे.
मेहर न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, राजधानी तेहरानच्या कोम प्रांतातील एका बँकेच्या मॅनेजरने गुरुवारी हिजाबशिवाय असलेल्या एका अज्ञात महिलेला बँक सेवा दिली होती. हिजाबशिवाय बँकेत आलेल्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. परिणामी, गव्हर्नरच्या आदेशाने बँक मॅनेजरलाच पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.
बँकेचे डेप्युटी गव्हर्नर अहमद हाजीजादेह यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहर वृत्तसंस्थेने सांगितलं आहे की, हिजाबशिवाय बँकेत आलेल्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर अनेकांनी त्या व्हिडीओवर कमेंट केल्या. हाजीजादेह म्हणाले की इराणमधील बहुतेक बँका राज्य-नियंत्रित आहेत. हिजाब कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही बँक मॅनेजरची जबाबदारी आहे.
महसा अमिनीच्या मृत्यूनंतर आंदोलन तीव्र
इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शनं सुरुच आहेत. पोलिसांच्या अटकेत एका महिलेचा मृत्यू झाल्यानं महिलांनी आक्रमक भूमिका घेत हिजाबविरोधी आंदोलन तीव्र केलं. इराणमध्ये हिजाब न घातल्यानं एका महिलेला अटक करण्यात आली होती. त्या महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांच्या अटकेत असताना महसा अमिनीचा मृत्यू (Mahsa Amini Death) झाला. यानंतर इराणमधील महिलांना निदर्शनं करण्यास सुरुवात केली.
इराणमध्ये हिजाब घालणे अनिवार्य
इराणमध्ये 1979 च्या क्रांतीनंतर चार वर्षांनंतर हिजाब अनिवार्य करण्यात आला. त्यानंतर बदलत्या कपड्यांसह, घट्ट जीन्स आणि सैल, रंगीबेरंगी हेडस्कार्फमध्ये महिला दिसणे सामान्य झालं होतं. परंतु या वर्षी जुलैमध्ये, राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी हिजाब अनिवार्य केलं. यानंतर अनेक महिलांनी रस्त्यावप उतरून निदर्शनं केली. या आंदोलनांमध्ये अनेक जणांचा मृत्यूही झाला.
महिलांकडून केस कापून, हिजाब जाळत निषेध
हिजाब विरोधी आंदोलनामुळे इराणमध्ये मागील काही महिन्यांपासून वातावरण तापलेलं आहे. महिलांकडून केस कापून आणि हिजाब जाळत सरकारचा निषेध करण्यात आला. सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. अद्यापही इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनं सुरु आहेत. अनेक परिसरात यामुळे तणावाचं वातावरण आहे.