China Lockdown : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे 30 हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र जनता लॉकडाऊन विरोधात रस्त्यावर उतरली आहे. जनतेकडून लॉकडाऊन हटवण्यासाठी निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान 10 जणांचा मृत्यू झाला आहे.


चीनमध्ये कोरोनाची दहशत कायम


चीनमध्ये अजूनही कोरोनाची दहशत कायम आहे. चीनमध्ये गेल्या सहा महिन्यांमधील विक्रमी कोरोना रुग्ण वाढ पाहायला मिळत आहे. बीजिंगमध्ये गुरुवारपासून रविवारपर्यंत दररोज सुमारे 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढताना दिसत आहे. बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. त्यामुळे चीन सरकारने पुन्हा एकदा झिरो कोविड धोरण लागू करत अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लागू केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या शून्य कोविड धोरणालाही देशात विरोध होऊ लागला आहे. लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आहेत.


जनतेकडून सरकारविरोधात निदर्शनं, 10 जणांचा मृत्यू


नानजिंग आणि बीजिंगसह अनेक शहरांमधील विद्यापीठांमधील विद्यार्थी शांततापूर्ण निदर्शनांसाठी हातात कोरे कागद घेऊन दिसले. मात्र त्यानंतर आंदोलन तीव्र झालं या आंदोलनात 10 जणांचा मृत्यू झाला. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशात कोरोना संसर्गाची प्रकरणं वेगाने वाढत आहेत आणि रविवारी एका दिवसात 40,000 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सलग चौथ्या दिवशी संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्यापासून ही संख्या सर्वाधिक आहे.


बीजिंगमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई


चीनची राजधानी बीजिंगमध्ये परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. बीजिंगमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. क्वारंटाईन सेंटरमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. नवीन क्वारंटाईन सेंटर उभारली जात आहे. बीजिंगमधील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनबाबत आणि कठोर निर्बंधांमुळे अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंची मागणी वाढली आहे. लोक घाबरून सुपरमार्केट आणि ऑनलाइन साईटवरून जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड खरेदी करत त्यांचा साठा करत आहे. 


चीनमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शहरातील बहुतेक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. जागोजागी नाकेबंदी करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याआधी कोरोना अहवाल तपासला जात आहे. अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमागृहे बंद करण्यात आली आहे.