नवी दिल्ली : इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेनं युद्धात थेट उडी घेतल्यानंतर इराणच्या पाठीशी अनेक देश उभे राहिले आहेत. यामुळं जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अमेरिकेनं तीन आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर देखील इराणनं माघार घेतलेली नाही. अमेरिकेनं इराणमधील तीन आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर इराण माघार घेईल अशी आशा डोनाल्ड ट्रम्प यांना होती. मात्र, इराणनं तातडीनं इस्त्रायलवर 40 बॅलेस्टिक मिसाईलचा मारा केला. इराण- इस्त्रायल संघर्षात पहिल्यांदा खेबर शिकनचा क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं इराण रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सनं म्हटलं. 

Continues below advertisement


इराणनं खेबर शिकन या क्षेपणास्त्राची निर्मिती गेल्या दोन वर्षांपूर्वी केली होती. इराणनं इस्त्रायलवर ज्या 40 मिसाईलचा मारा केला त्यामध्ये खेबर शिकनचा समावेश होता, असं इराणमधील मीडियानं म्हटलं आहे. इराणनं हा हल्ला अमेरिकेनं तीन आण्विक तळांवर हल्ला केल्यानंतर केला. 


 इस्त्रायलच्या सैन्यदलानं इराणकडून 10 ठिकाणांवर मिसाईल हल्ले करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यामुळं  तेल अविव, हायफा आणि इतर केंद्रीय शहरांमध्ये  सायरन वाजवले जात होते. हायफाच्या उत्तरेकडील भागात 31 जण जखमी झाल्याची माहिती आहे, त्यापैकी काही जण जखमी झाल्याचं जेरुसलेम पोस्टनं म्हटलं आहे. 


इस्त्रायलच्या आयर्न डोमकडून इराणकडून करण्यात असलेल्या हल्ल्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, इराणकडून अत्याधुनिक मिसाईलचा मारा केला जात असल्यानं त्यावर मर्यादा येत आहेत. ज्यामध्ये खेबर शिकनचा देखील समावेश आहे. खेबर शिकनची 1450 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. खेबर शिकनचा हल्ल्या परतवण्यात  इस्त्रायलच्या आयर्न डोमला मर्यादा येत असल्याचं समजतं. 


इराणनं 2022 मध्ये खेबर शिकनची निर्मिती केली होती. इराणमधील खेबर शिकन हे थर्ड जनरेशन क्षेपणास्त्र आहे. ज्याची निर्मिती आयआरजीसीनं केली आहे. या क्षेपणास्त्राला लाँचिंग पूर्वी ट्रॅक करणं देखील अवघड असतं. 


अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पलटवार


अमेरिकेनं भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी पहाटे 4.10 मिनिटांनी इराणमध्ये ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरु केलं. पुढच्या 25 मिनिटांमध्ये तीन आण्विक तळांवर हल्ले करण्यात आले. US B-2 स्टील्थ बॉम्बर्स आणि तोमहॉक क्रूझ मिसाईलचा मारा फोर्डो, नतान्झ आणि इस्फाहान या आण्विक केंद्रांवर करण्यात आला. यानंतर एका तासात इराणनं इस्त्रायलवर हल्ले केले.  


अमेरिकेनं इराणचा आण्विक कार्यक्रम नष्ट केल्याचा दावा केला आहे. तर, इराणनं अमेरिकेनं सुरुवात केली आहे, आम्ही शेवट करु असं म्हटलं आहे.