इराण आणि भारत यांच्यात चार वर्षांपूर्वी चाबहारहून अफगाणिस्तान सीमेवर जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग बनवण्यासंदर्भात करार झाला होता. आता इराणने हा प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून यावर कामही सुरु केलं आहे.
'द हिंदू'च्या वृत्तानुसार, भारताकडून या प्रकल्पासाठी निधी मिळण्यास विलंब होत आहे, परिणामी आम्ही स्वत:च यावर काम करण्यास सुरुवात केली आहे, असं इराणचं मत आहे. 628 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग बांधण्याचं काम मागील आठवड्यात सुरु झालं आहे. इराणचे वाहतूर शहरी विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी याचं उद्घाटन केलं. हा रेल्वे मार्ग सीमा पार करुन अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जातो.
इराणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा प्रकल्प मार्च 2022 पर्यंत पूर्ण केला जाईल. यासाठी आता इराणच्या राष्ट्रीय विकास निधीचा वापर केला जाईल.
चार वर्षांपूर्वी भारत-इराण-अफगाणिस्तानमध्ये करार
चार वर्षांपूर्वी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचा दौरा केला होता. तेव्हा हा करार भारत-अफगाणिस्तान आणि इराणमध्ये झाला होता. तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष रुहाणी, अफगाणिस्तानचे अध्यक्ष घणी आणि आयआरसीओएन यांच्यात चाबहार रेल्वे मार्गाच्या योजनेबाबत करारावर स्वाक्षरी केली होती. इराणी रेल्वे मंत्रालयासोबत झालेल्या या रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या करारात भारताकडून इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेडचा (IRCON)सहभाग होता.
चीन-इराण करार, 25 वर्षांपर्यंत 400 अब्ज डॉलरची गुंतवणूक
दरम्यान इराण आणि चीनमध्ये 25 वर्षांच्या रणनीती करारावर चर्चा झाली आहे. सुमारे 400 अब्ज डॉलरचा करार असेल. मात्र इराणच्या संसद मजलिसकडून याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या करारानुसार, चीन अतिशय कमी दरात पुढील 25 वर्षांपर्यंत इराणमधून तेल खरेदी करणार आहे. या मोबदल्यात चीन बँकिंग, दूरसंचार, बंदर, रेल्वे आणि वाहतूक इत्यादी सेवांमध्ये गुंतवणूक करणार आहे.
भारत आणि अमेरिकेला झटका
सध्या इराण आणि चीन या दोन्ही देशांचा अमेरिकेसोबत वाद सुरु आहे. आण्विक कार्यक्रमावरुन इराण आणि अमेरिके यांच्यात वाद आहे. तर ट्रम्प सरकारचे चीनसोबत अनेक मुद्द्यावर वाद आहेत. त्याचवेळी सीमेवरील तणावामुळे भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरु असून सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे इराण-चीनमधील करार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी झटका असल्याचं जाणकारांचं मत आहे. भारताने इरानच्या चाबहार बंदराच्या विकासावर अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. अमेरिकेच्या दबावामुळे इराणसोबत भारताचं सध्या नातं नाजूक आहे.
भारत आणि इराणमध्ये सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध आहेत. 1950 मध्ये दोन्ही देशांमध्ये राजकीय संबंधांची सुरुवात झाली. तेहरानमध्ये भारताच्या दूतावासाशिवाय बंदर अब्बास आणि जहेदानमध्ये कॉन्सूलेटही आहे. तर इराणचंही नवी दिल्लीतीली दूतावासाशिवाय मुंबई आणि हैदराबादमध्ये कॉन्सूलेट जनरल आहेत.