Internet Apocalypse : येत्या काळात पूर्वानुमान करता न येऊ शकणाऱ्या सौर वादळामुळे पृथ्वीवरील इंटरनेटची सेवा ही काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत बंद पडण्याची शक्यता आहे. सौर वादळं ही शक्यतो 100 वर्षातून एकदाच येतात पण त्यामुळे पृथ्वीवरील इंटरनेटसंबंधी पायाभूत सुविधा उखडून टाकल्या जातील, त्या बंद पडतील असं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. 


कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या असिस्टंट प्रोफेसर संगिता ज्योती यांनी हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल SIGCOMM (Association for Computing Machinery's Special Interest Group on Data Communications) 2021 मध्ये सादर करण्यात आला आहे असं लाईव्ह सायन्सने सांगितलं आहे. हा अहवाल अद्याप कोणत्याही जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला नाही, 


संगिता ज्योती यांनी केलेल्या संशोधनानुसार, येत्या काळात पृथ्वीवर येणाऱ्या सौर वादळामुळे इंटरनेट व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. जगातले इंटरनेट अनेक दिवस किंवा अनेक महिने बंद पडू शकते. आणि महत्वाचं म्हणजे या सौरवादळाचे पूर्वानुमान लावता येणं कठीण आहे. हे सौरवादळ पृथ्वीवर धडकणार याचे पूर्वानुमान केवळ एखादा दिवस आधीच लावता येणं शक्य आहे असंही या अहवालात सांगितलं आहे. 


जगभरात इंटरनेटचं जाळं पसरवण्यासाठी समुद्रातून केबल टाकण्यात आल्या आहेत. जर 19 व्या शतकात ज्या क्षमतेचे सौर वादळ आलं होतं त्याच क्षमतेचे सौर वादळ आता आलं तर या केबल्स निकामी होऊ शकतात. सध्या इंटरनेट संबंधी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व साधने ही तितक्या क्षमतेची नाहीत. त्यामुळे या सौरवादळात इंटरनेट संबंधी सर्व साधने निकामी होऊ शकतात असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 


काय आहे सौर वादळ? 
सौर वादळ हे सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील अनियमिततेमुळे तयार होणारे वादळ आहे. सूर्यावर दिसणारे डाग कालांतराने मोठे होतात. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त बलवान असतं तेव्हा सौर डागांची संख्या वाढते, मोठे झालेल्या डागाच्या ठिकाणी विस्फोट होऊन सौरवादळांची निर्मिती होते.


सौर वादळाचा मानवी शरीरावर प्रत्यक्ष परिणाम आढळत नसला तरी पृथ्वीवरील संदेशवहन यंत्रणा व वीजपुरवठा पूर्णपणे निकामी करण्याची ताकद सौरवादळांमध्ये असते. सौर वादळे सूर्याच्या पृष्ठभागावर निर्माण झाल्यानंतर त्याच्या लहरी बाहेर फेकल्या जातात. या लहरींच्या प्रसारणाच्या मार्गात पृथ्वी आल्यावर त्याचे परिणाम पृथ्वीवर होतात. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सुर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल. यांना विश्वकिरण असेही म्हणतात