International Chess Day 2023 : बुद्धिबळ हा खेळ म्हणजे रणनीती आणि चातुर्य यांचा योग्य मेळ घालून खेळला जाणारा खेळ आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन हा 20 जुलै रोजी साजरा केला जातो. बुद्धिबळ हा फार जुना खेळ आहे. FIDE म्हणजे ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस ‘जागतिक बुद्धिबळ दिन’म्हणून साजरा केला जातो.


बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नाही तर त्यातून रणनीती बनवण्याची क्षमता विकसित होते आणि तुमची दृश्य स्मरणशक्तीही वाढते. तुम्हाला माहित असेलच, हा रणनीतीवर आधारित बोर्ड गेम आहे. म्हणूनच ते खेळल्याने रणनीती बनवण्याची क्षमता विकसित होते.  


आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाच्या माध्यमातून केवळ फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेक्स (FIDE) यांना सन्मानित केले जात नाही. तर, लोकांमध्ये बुद्धिबळ खेळण्याची आवड निर्माण करण्याचाही या दिनामागचा हेतू आहे.


भारतीय खेळ युरोपियन देशांमध्ये पोहोचला


बुद्धिबळ या खेळाचा उगम भारतात झाला असे मानले जाते. सुमारे 1500 वर्षांपूर्वी "चतुरंग" नावाचा खेळ खेळला जात असे. हा खेळ बुद्धिबळ सारखाच असायचा. पुढे हा खेळ विस्तारत गेला आणि तो पर्शिया देशापर्यंत पोहोचला आणि अरब राजवटीच्या छत्राखाली पुढे विकसित झाला. तिथून हा खेळ दक्षिण युरोपात पोहोचला. अशा रीतीने भारतातील हा प्राचीन खेळ विकसित होऊन युरोपियन देशांमध्ये पोहोचला.


15 व्या शतकात बुद्धिबळाचा खेळ युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर विकसित झाला. सध्या बुद्धिबळ खेळासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. बुद्धिबळाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक बदल पाहिले आहेत. पूर्वी हा खेळ खेळण्यासाठी वेळेची व्यवस्था नव्हती. नंतर 1861 मध्ये, गेममध्ये वेळ प्रणालीसह विविध कौशल्यपूर्ण नियम जोडले गेले.  


आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना


फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेक्स (FIDE) ची स्थापना 20 जुलै 1924 रोजी पॅरिसमधील आठव्या ऑलिंपिक खेळांमध्ये झाली. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस 20 जुलै 1966 रोजी फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेक्स (FIDE) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्याचवेळी युनेस्कोने 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून घोषित करण्याची सूचना केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर, जे देश हा खेळ खेळतात त्यांचे स्वतःचे FIDE प्रमाणेच बुद्धिबळ महासंघ आहेत. या विविध राष्ट्रांच्या बुद्धिबळ महासंघांचे प्रतिनिधित्व FIDE द्वारे केले जाते. FIDE चे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर रुएब नावाचे डच वकील आणि मुत्सद्दी होते. FIDE मध्ये विविध देशांतील 181 सदस्य फेडरेशन आहेत.