नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटननेने 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांच्या बसवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीमा सुरक्षा बलाचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर 13 दिवसांनी 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. तेव्हापासून पाकिस्तानने भारताला त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. परंतु ही बंदी आता उठवण्यात आली आहे.


पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई हद्दीतून प्रवास करण्यास बंदी घातल्यानंतर ही बंदी 30 मेपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी भारताचे पहिले विमान पाकिस्तानमार्गे दुबईहून दिल्लीत दाखल झाले. त्यासाठी पाकिस्तानने त्यांचे अहमदाबादजवळचा एंट्री पॉईंट खुला केला होता.

भारताचे विमान सुखरुप दिल्लीत पोहोचल्यानंतर इंडिगो फ्लाईट ऑपरेशन्स सेंटरला पाकिस्तानच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीच्या (CAA) संचालकांचा फोन कॉल आला. ते म्हणाले की, आम्ही तुमच्या विमानाचे मॉनिटरिंग करत आहोत. तुमचे विमान यशस्वीरित्या तुमच्या विमानतळावर उतरल्याचे समजले आहे. तुम्हाला आम्ही शब्द दिला होता. ईद मुबारक. असे म्हणत त्यांनी ईदच्या शुभेच्छाही दिल्या.

30 मे नंतर भारतीय विमानांसाठी हवाई मार्ग खुला करण्याचे आश्वासन पाकिस्तानने भारताला दिले होते. ते आश्वासन पाळल्याचे सांगण्यासाठी त्या अधिकाऱ्याने फोन केला होता. त्याचवेळी त्यांनी रमजान ईदच्या शुभेच्छादेखील दिल्या.