जकार्ता : इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती सुकार्णो यांची कन्या सुकमावती सुकार्णोपुत्री यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला असून त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. सुकमावती सुकार्णोपुत्री यांनी बालीमध्ये एका कार्यक्रमात हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. या संबंधिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर यावर अनेक प्रतिक्रिया येत असून ही घटना म्हणजे सनातन धर्माचा प्रसार असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे.


सुकमावती सुकार्णोपुत्री यांनी हिंदू धर्माचा स्वीकार हा पारंपरिक रिती रिवाजांचे पालन करुन केला आहे. पुजारींनी मंत्रांच्या उच्चारात सुकमावती सुकार्णोपुत्री यांच्यावर जल शिंपडले. त्यांची परंपरेनुसार आरती ओवाळण्यात आली तसेच अन्य विधींचे पालनही करण्यात आले. सुकमावती सुकार्णोपुत्री या हिंदू धर्मातील परंपरा आणि प्रथांशी चांगल्याच परिचित आहेत. सुकमावती सुकार्णोपुत्री यांच्या आजी या बालीस्थित हिंदू धर्माच्या होत्या. त्यांच्या घरीच सुकमावती सुकार्णोपुत्री यांनी धर्मांतर केलं. त्यांचं हे घर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हिंदू लोक बहुसंख्य प्रमाणात वस्ती करतात.


सुकमावती सुकार्णोपुत्री यांनी केलेल्या या धर्म परिवर्तनाला त्यांच्या कुटुंबियांनी पाठिंबा दिला आहे. इंडोनेशियातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या कार्यक्रमात सामान्य लोकांना सहभागी होण्यापासून बंदी घालण्यात आली होती. केवळा काही खास आमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पाडण्यात आला. 


इंडोनेशिया हा मुस्लिमबहूल लोकसंख्या असलेला देश आहे. पण या देशात हिंदू धर्मियांची संख्याही मोठी आहे. इंडोनेशियामध्ये पूर्वी हिंदू धर्माचा प्रसार करण्यात आला होता. त्या देशात आजही अनेक प्राचिन हिंदू मंदिरं आहेत. 


महत्वाच्या बातम्या :