Ukraine Russia War : युद्धग्रस्त युक्रेनच्या पूर्वेकडील सुमी शहरात अडकलेल्या भारतीयांबद्दल भारत सध्या चिंतेत आहे. भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना सुमी भागातील लोकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी त्वरित युद्धविराम करण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारांना सांगितले की, 'सरकारला विद्यार्थ्यांचे हाल आणि त्यांची मानसिक स्थिती समजते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. भारताने विविध माध्यमांद्वारे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना तात्काळ युद्धविराम करण्यास सांगितले आहे जेणेकरून लोकांना संघर्षग्रस्त भागातून सुरक्षितपणे बाहेर काढता येईल.'


सुमीमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत बागची यांनी सांगितले की, 'आम्ही विविध पर्यायांवर काम करत आहोत पण त्या भागातील गोळीबार, हिंसाचार आणि वाहतुकीची समस्या हे आमचे मुख्य आव्हान आहे. म्हणूनच आम्ही दोन्ही देशांना स्थानिक युद्धविरामासाठी आवाहन करत आहोत आणि ते अद्याप झालेले नाही.पण ते लवकरच होईल अशी आशा आहे.'


बागची म्हणाले, 'ही युद्धाची परिस्थिती आहे आणि आमची मूलभूत गरज आहे की सुरक्षित मार्ग असणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थी कॅम्पसमधून बाहेर पडतात तेव्हा सुरक्षित राहतील.' बागची यांनी शुक्रवारी सांगितले होते की, सुमीमध्ये सुमारे 700 भारतीय अडकले आहेत. हा भाग रशियन सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात विद्यार्थी त्यांना संघर्ष क्षेत्रातून त्वरित बाहेर काढण्याचे आवाहन करत आहेत.


याबाबत विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा भाग रशियाच्या सीमेपासून 60 किमी अंतरावर आहे आणि तेथे संचारबंदीही लागू करण्यात आली आहे, त्यामुळे तेथून पायी जाणे शक्य नाही. इतर पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha