जेरुसलेम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इस्रायलच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजता मोदी इस्रायलसाठी रवाना झाले असून संध्याकाळी साडेसहा वाजता ते पोहचतील. पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत.


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे नरेंद्र मोदींना अॅग्रीकल्चरल फार्म दाखवणार आहेत. त्यानंतर मोदींसाठी खास जेवणाचीही सोय करण्यात येणार आहे. या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होतील, असा विश्वास बेंजामिन नेत्यानाहू यांनी व्यक्त केला आहे.

मोदी हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी मी स्वत: अनेक कार्यक्रमांना हजर राहणार आहे असल्याचंही नेत्यानाहू यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.

दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन 25 वर्ष झाली आहेत. याच निमित्ताने हा दौरा आखण्यात आला असून भारतीय पंतप्रधानांचा पहिला इस्रायल दौरा म्हणून याला विशेष महत्त्व आहे.