Covaxin vaccine updates : कॅनबरा/नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेकडून कोवॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यासाठी टाळाटाळ होत असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकारने मंजुरी दिली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या आरोग्य विभागाने भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन लशीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही लस घेतलेल्या 12 वर्षावरील नागरिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश मिळणार आहे. कोवॅक्सिन लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे, असे मानले जाणार आहे.  ऑस्ट्रेलियाच्या थॅरेप्यूटिक गुड्स एडमिनिस्ट्रेशनने (TGA)कोवॅक्सिनला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. 


भारतातील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ'फेरेल एओ यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन सरकारने प्रवाशांच्या लशीकरणाबाबतची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजुरी दिली आहे. 


कोवॅक्सिनकडून अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा: WHO


भारतात निर्मिती झालेल्या कोवॅक्सिन लशीचा आपात्कालीन वापरासाठीच्या यादीत समावेश करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आणखी काही माहिती मागितली होती. येत्या काही दिवसात लस मंजुरीसाठीची बैठक पार पडण्याची शक्यता आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, आपात्कालीन उपयोग यादी (ईयूएल) मध्ये एखाद्या लशीचा समावेश करण्यासाठी WHO चे एक स्वतंत्र सल्लागार गट आहे. या सल्लागार गटाकडून WHO ला शिफारस करण्यात येते. त्यानंतर संबंधित लशीचा समावेश आपात्कालीन वापराच्या यादीत करण्यात येतो.   



भारत बायोटेकने निर्मिती केलेल्या कोवॅक्सिन लशीचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या ईयूएल यादीत न झाल्याने ही लस घेतलेल्या भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यात अडचणी उद्भवत आहेत. मागील काही महिन्यांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडे याबाबत पाठपुरवठा सुरू आहे. 



फायझर, अॅस्ट्राझेनेका, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, सिनोवॅक आणि सिनोफार्म या लशीचा समावेश WHO ने आपत्कालीन वापर यादीत (EUL)  केला आहे.


 


संबंधित बातम्या:


Bharat Biotech Covid Vaccine: कोवॅक्सिन लसीला आठवडाभरात WHO ची मंजुरी मिळण्याची शक्यता


Covaxin + Covishield कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिक्स डोस अधिक परिणामकारक, ICMR चा अभ्यास