दुबई : भारतीय वंशाच्या उद्योगपतीने आपल्या रोल्स रॉईसच्या अनोख्या नंबरप्लेटसाठी मोठी रक्कम मोजली आहे. त्याने या नंबरप्लेटसाठी तब्बल 9 मिलियन दिनार म्हणजेच जवळपास 60 कोटी रुपये खर्च केले आहेत.
बलविंदर साहनी असं या उद्योगपतीचं नाव आहे. दुबईत राहणाऱ्या या व्यावसायिकाने आपल्या दुबई लायसन्स प्लेट 'D5' साठी ही रक्कम दिली आहे. साहनी यांनी बोली लावून हा नंबर मिळवला आहे. साहनी यांनी आणखी एक नंबर जवळपास 18 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. "9 नंबर माझ्यासाठी फायदेशीर आहे, त्यामुळे D5 हा नंबर आपण घेतला आहे. D चा चौथा नंबर आहे. त्यात 5 मिळवल्यास 9 बेरीज येते," असं बलविंदर साहनी यांनी सांगितलं आहे.
शनिवारी दुबईतील रस्ते वाहतूक कार्यालयाकडून या व्हीआयपी नंबरचा लिलाव करण्यात आला. बलविंदर साहनी यांनी मागच्याच वर्षी 25 मिलियन दिनार म्हणजेच जवळपास 45 कोटी रुपये देऊन 09 नंबरची प्लेट खरेदी केली होती.
बलविंदर सिंह दुबईत रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. गेल्या 10 वर्षांपासून ते दुबईत राहात आहेत. आरएसजी इंटरनॅशनल ग्रुप ऑफ कंपनीजचे ते अध्यक्ष आहेत.