Indian Billionaires Giving Up Country Citizenship : भारतीय (India) अब्जाधीशांना (Billionaires) भारतात राहण्याची इच्छा नसल्याचं दिसून येत आहे. भारतातील बहुतेक श्रीमंत लोक देश सोडून जात आहेत. यासाठी अब्जाधीष जो मार्ग अवलंबत आहेत त्याला रेसिडेन्स बाय इन्व्हेस्टमेंट म्हणतात. भारतीय नागरिकत्व सोडलेल्या या श्रीमंत लोकांना HNIs किंवा Dollar Millionaires असं म्हटलं जातं. रेसिडेन्स बाय इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. हाय नेट वर्थ इंडिव्हिजुअल असलेली व्यक्ती होण्यासाठी किती मालमत्तेची आवश्यकता आहे आणि कोणत्या कारणांमुळे हे लोक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत, हे जाणून घ्या.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2022 मध्ये 2 लाख 25 हजार भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. 2011 ते 2022 पर्यंत नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ही आकडेवारी 9 फेब्रुवारी रोजी संसदेत माहितीस्तव देण्यात आली होती.
भारत सोडण्याचे 'हे' आहे कारण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोकऱ्यांच्या चांगल्या संधी, आरोग्यसेवा, राहणीमानाचा दर्जा आणि उत्तम शिक्षण यासारख्या कारणांमुळे हे लोक भारत सोडून जात आहेत. याशिवाय अनेक कारणांमुळे हे लोक देश सोडून जात आहेत. अशाच एका केस स्टडीमध्ये एका कुटुंबाने सांगितले की, "ते 2019 मध्ये कॅनडाला गेले होते आणि 2022 मध्ये त्यांनी कॅनडाच्या कायमस्वरुपी रहिवासी होण्यासाठी अर्ज केला होता." यामागचे होतं की, आपल्या मुलाची शाळा वारंवार बदलणे त्यांना योग्य वाटत नव्हतं. याशिवाय आणखी एक धक्कादायक बाबही त्यांनी सांगितली.
देश सोडलेल्यांची काय प्रतिक्रिया?
कुटुंबाने सांगितलं की, "दिल्लीत राहत असताना त्यांच्या मुलीला तेथील खराब हवेमुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. प्रदूषित दिल्लीच्या तुलनेत कॅनडातील शहराची हवा स्वच्छ आणि श्वास घेण्यायोग्य आहे. तेथे गेल्यानंतर त्यांच्या मुलीला श्वास घेण्यास त्रास जाणवला नाही. त्यामुळे, हे देखील त्यांच्या कॅनडामध्ये कायमस्वरपी रहिवासीसाठी अर्ज करण्याचं एक कारण ठरलं. पाच वर्षांनी कायमस्वरुपी रहिवासीसाठी एकदा अर्ज केल्यानंतर, अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यानंतर, कॅनेडियन नागरिकत्व देखील उपलब्ध आहे.
HNI म्हणजे नक्की काय?
भारताचे नागरिकत्व सोडून देणाऱ्या अब्जाधीशांना एचएनआय (HNI) असं म्हणतात. ज्यांची एकूण संपत्ती एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे अशा लोकांचा यामध्ये समावेश होतो. एक दशलक्ष डॉलर्स म्हणजे 8.2 कोटी रुपये. हेन्ली ग्लोबल सिटिझन्स रिपोर्टनुसार, भारतात या गटातील सुमारे 3 लाख 47 हजार लोक आहेत. हा आकडा डिसेंबर 2021 पर्यंतचा आहे. हे 3 लाख 47 हजार लोक भारतातील केवळ नऊ शहरांमधील आहेत. या शहरांमध्ये देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई या शहरांचा समावेश आहे.