मुंबई : भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रं स्वीकारली आहेत. 'आयएमएफ' (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रमुखपद देण्यात आलं असून भारतीय महिलेला हा सन्मान मिळणं अभिमानास्पद आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गीता गोपीनाथ यांची या पदावर निवड झाली होती. मॉरिस ऑब्सफेल्ड 31 डिसेंबर रोजी मुख्य अर्थतज्ज्ञाच्या पदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर गीता यांना पदभार स्वीकारला.

गीता गोपीनाथ यांचा जन्म म्हैसूरमध्ये झाला होता. हार्वर्ड विद्यापीठात त्या प्राध्यापक होत्या. गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक ऑक्टोबर रोजी त्यांची नियुक्‍ती जाहीर करताना गीता गोपीनाथ या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञ असल्याचं म्हटलं होतं.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद याआधी रघुराम राजन यांनीही भूषवलं आहे. त्यांच्यानंतर हा मान मिळणार्‍या त्या दुसर्‍या भारतीय ठरल्या आहेत.