India-UAE Virtual Summit Highlights : भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने आपली रणनीतिक भागिदारी आणखी मजबूत करण्यासाठी नवीन रोडमॅप तयार केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नायहान यांच्यात झालेल्या र्व्हच्युअल बैठकीत दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक सहकार्य करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. जाणून घेऊयात, या दोन देशांमधील करारातील दहा महत्त्वाच्या गोष्टी :


1. संरक्षण आणि सुरक्षा


दोन्ही देशांकडून सागरी सुरक्षेतील सहकार्य आणखी दृढ करतील. प्रत्येक प्रकारचा दहशतवाद, कट्टरतावादाविरोधात क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करतील. 


2. आर्थिक सहकार्य


भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये व्यापक आर्थिक सहकार्य करण्यावर एकमत झाले. दोन्ही देशांमधील व्यवसाय हा 60 अब्ज डॉलरवरून वाढवून येत्या पाच वर्षात 100 अब्ज डॉलरपर्यंत करण्यात येणार आहे. 


3. ऊर्जा सहकार्य


भारत युएईकडून एक तृतीयांश कच्चे तेल आयात करतो. युएईकडून या पुढील काळातही भारताला परवडणाऱ्या दरात आणि अखंडपणे कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येणार आहे. 


4. हवामान बदल आणि अपारंपरिक संसाधने


दोन्ही देश मिळून एक हायड्रोजन टास्क फोर्स तयार करतील आणि इंधनासाठी ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन वाढवतील.


5. नवीन तंत्रज्ञान


एकत्रितपणे, दोन्ही देश अत्यावश्यक तंत्रज्ञानावर सहकार्य वाढवतील. तसेच एकमेकांच्या देशातील स्टार्ट अपला प्रोत्साहन देतील. 


6. शैक्षणिक सहकार्य


भारताच्या मदतीने UAE मध्ये IIT स्थापन करण्यात येणार आहे.


7. कौशल्य सहकार्य


भारत आणि UAE कौशल्य विकासाच्या क्षेत्रातही सहकार्य करतील. जेणेकरुन बाजारपेठेतील बदलत्या गरजा आणि भविष्यातील कामकाजानुसार मानव संसाधन विकसित करता येईल.


8. अन्न सुरक्षा


दोन्ही देश अन्नधान्य उत्पादन आणि पुरवठ्यात सहकार्य करतील. शेतांपासून ते बंदरे आणि युएईच्या बाजारपेठेपर्यंत सहकार्य करतील. यासाठी एक मजबूत साखळी तयार केली जाईल.  


9. आरोग्य


भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने संशोधन, उत्पादन आणि लसींच्या पुरवठा साखळीवर एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी UAEही गुंतवणूक करणार आहे.


10. सांस्कृतिक सहकार्य


भारत आणि UAE दरम्यान सांस्कृतिक प्रकल्प, प्रदर्शने आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला जाणार आहे.