मुंबई : भारत आणि मालदीवचे (India Maldives Relation) संबंध मागील काही काळात ताणले गेले आहेत. भारतासोबतच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये मालदीव चीनला (China) समर्थन करताना दिसत आहे. चीनची पाठराखण करणाने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू (Mohamed Muizzu) यांचं सरकार सध्या संकटात सापडल्याचं समोर आलं आहे. भारताकडून मालदीव सैन्याला दान केलेले तीन विमान उडवण्यासाठी कुणी पात्र नसल्याचं समोर आलं आहे. खुद्द मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांनी हे मान्य केलं आहे. भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी मालदीवकडे सध्या सक्षम वैमानिक नसल्याची कबुली संरक्षण मंत्री घसान मौमून यांनी दिली आहे.
भारतीय जवानांनी मालदीव सोडल्यानंतरची परिस्थिती
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांचं सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी चीनला समर्थन करत भारतीय सैन्य माघारी धाडलं. मोहम्मद मुइज्जू यांच्या आदेशानंतर 76 भारतीय संरक्षण कर्मचारी मालदीव सोडून मायदेशी परतले आहेत. त्यानंतर मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांचं हे मोठं वक्तव्य समोर आलं आहे. मालदीवच्या राष्ट्रपतींनी 10 मे 2024 पर्यंत मालदीवमधील तीन विमानचालन प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या सर्व भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याची भूमिका घेतल्यानंतर भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतीय सैन्याने मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान दिलं होतं. मात्र, भारताने दिलेली विमाने चालवण्यासाठी मालदीवकडे पात्र वैमानिक नाहीत. राष्ट्रपती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान 11 मे रोजी, शनिवारी, मालदीवचे संरक्षण मंत्री घसान मौमून यांनी हे सांगितलं आहे. मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिक माघारी परतल्यानंतर पुन्हा भारतीय सैनिकांच्या आगमनासंबंधी प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
मालदीवकडे विमान चालवण्यासाठी पात्र वैमानिक नाही
मालदीवच्या संरक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सकडे (MNDF) एकही लष्करी कर्मचारी नाही, जो भारतीय लष्कराने दान केलेली तीन विमाने चालवू शकेल. काही सैनिकांना आधीच्या सरकारांच्या करारांतर्गत विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
संरक्षण मंत्री घसान मौमून काय म्हणाले?
मालदीवचे संरक्षण मंत्री घसान मौमून म्हणाले, विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते, ज्यासाठी वैमानिकांनी विविध टप्पे पार करणे आवश्यक होते. अनेक कारणांमुळे आमचे सैनिक ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे सध्याच्या स्थिती आपल्या लष्करी दलात अशी एकही व्यक्ती नाही, ज्याच्याकडे भारताने दिलेले दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमान उडवण्याचा परवाना आहे किंवा ज्याच्याकडे उड्डाणाचे पूर्ण प्रशिक्षण आहे. त्यामुळे सध्या भारताने दिलेली विमाने मालदीव वापरु शकत नाही, असं घसान मौमून यांनी म्हटल्याचं वृत्त 'Adhadhoo.com' या न्यूज पोर्टलने दिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :