मुंबई : बर्ड फ्लूचा (H5N1) वाढता धोका पाहायला मिळत आहे. H5N1 फ्लू बाबत उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्येही हा व्हायरस वेगाने पसरत आहे. एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये पसरू शकतो. केरळमध्ये बदकांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये आतापर्यंत तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरातील जलाशयांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांवरही पशूसंवर्धन विभाग लक्ष ठेवून आहे.


केरळमध्ये बर्ड फ्लू वेगाने पसरतोय


केरळमध्ये बदकांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही बर्ड फ्लूबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पशुसंवर्धन संचालनालयाने सर्व जिल्ह्यांतील पशुवैद्यकांना पक्ष्यांचा असामान्य मृत्यू झाल्यास त्यांचे नमुने भोपाळ येथील उच्च सुरक्षा पशू रोग प्रयोगशाळेत पाठवले जातील, असे निर्देश दिले आहेत. राज्यभरातील स्थलांतरित पक्ष्यांवरही पशुसंवर्धन विभाग लक्ष ठेवून आहे.


उत्तराखंडमध्ये पक्ष्यांचे नमुने तपासणार


उत्तराखंडमध्ये बर्ड फ्लूबाबत सतर्कतेसाठी पक्ष्यांचे नमुने घेण्यात येणार असून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. केरळमध्ये बर्ड फ्लू पसरल्यानंतर उत्तराखंडमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांतून विविध पक्ष्यांचे 50-50 नमुने घेण्यात येणार आहेत. व्हायरसची पुष्टी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपस्थित असलेल्या पक्ष्यांचे सेरो सॅम्पलिंग केले जाणार आहे. सॅम्पलिंगमध्ये पक्ष्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होत आहेत की नाही, हे पाहिले जाईल.


अमेरिकेत गायींना बर्ड फ्लूची लागण 


यूएसमध्ये H5N1 फ्लूमुळे दुग्ध व्यवसायावर संकट ओढवलं आहे. अमेरिकेत गायींना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. अमेरिकेत 9 राज्यांमधील 36 गायींमध्ये बर्ड फ्लूचे संक्रमण आढळले आहे. अशा स्थितीत अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दुधाच्या नमुन्यांची चाचणी करण्याचाही निर्णय घेतला आहे. मानवातील संक्रमणाचा संभावित धोका पाहता गोमांसाची चाचणी केली जात आहे.


दुग्ध व्यावसायिकांना सावधगिरीचा इशारा


काही ठिकाणी H5N1 फ्लूमुळे डेअरी कामगाराच्या डोळ्यात संसर्ग झाला असून चाचणी केल्यानंतर हा विषाणू आढळून आला आहे. प्रभावित कर्मचाऱ्यावर अँटीव्हायरल उपचार करण्यात आले आहेत. यूएस आरोग्य अधिकाऱ्याने दुग्धव्यवसाय कर्मचाऱ्यांना गायींमधील H5N1 बर्ड फ्लू संक्रमणाच्या धोक्याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 


बर्ड फ्लू म्हणजे काय?


बर्ड फ्लू (एव्हियन इन्फ्लूएंझा) हा इन्फ्लूएंझा व्हायरसच्या प्रकारामुळे होणारा संसर्ग आहे, जो सामान्यतः पक्षी आणि इतर प्राण्यांमध्ये पसरतो. कधीकधी ते मानवांना देखील संक्रमित करू शकते. मानवी फ्लूच्या इतर प्रकारांप्रमाणे, बर्ड फ्लू गंभीर असू शकतो आणि प्राणघातक होण्याची शक्यता जास्त असते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरणे हे अत्यंत दुर्मिळ आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या  :


Bird Flu : गाईच्या दुधात आढळला H5N1 बर्ड फ्लूचा विषाणू; दूध पिणे कितपत सुरक्षित?