मॉस्कोः भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियातील मॉस्कोमध्ये सुरु असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्याच्या मुद्दयावर सहमत झाले. भारत आणि चीनदरम्यान तणाव कमी करण्यासाठी एका पंचसूत्रीवर सहमती झाली आहे.


मॉस्कोमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे की, भारत एलएसी (लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) वर सुरु असलेला तणाव वाढवू इच्छित नाही. भारतानं म्हटलं आहे की, चीनसोबत भारताच्या धोरणात तसंच भारताविषयी चीनच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही.

भारत-चीनदरम्यान या पंचसूत्रीवर झाली सहमती
-आपापसातील मतभेदांचं वादात रुपांतर होऊ दिलं जाणार नाही
-दोन्ही देशांचं सैन्य विवादित क्षेत्रातू वापस घ्यावं
-निश्चित केलेल्या नियमांनुसार दोन्ही देशांमधील बातचीत सुरु ठेवावी
-सध्याच्या संधी आणि प्रोटोकॉल्स दोन्ही देश मानणार
-दोन्ही देश असं कुठलंही पाऊल उचलणार नाही ज्याने तणाव वाढेल


दोन तास चालली परराष्ट्र मंत्र्यांमधील बैठक
मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यातील बैठक काल रात्री आठ वाजता काँग्रेस पार्क वोलकोंस्की हॉटेलमध्ये सुरु झाली. ही बैठक जवळपास 10.30 वाजता संपली.


India-China Border Faceoff: तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लडाखच्या दौऱ्यावर, सीमेवरील तयारीचा आढावा


भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष 
भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. सीमेवर तणाव सुरु असतानाच पूर्व लडाखमध्ये 8 तारखेला एलएसीवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये गोळीबाराची घटना घडली. या प्रकरण संपूर्ण माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु सरकारशी संबंधित वरिष्ठ सूत्रांच्या मते परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. एलएसीवर भारत आणि चीन दरम्यान मागील काही महिन्यांपासून तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे 1975 नंतर सीमेवर भारत आणि चीन सैनिकामंध्ये प्रथमच गोळीबाराची घटना घडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चीनकडून भारतीय क्षेत्रात फायरिंग करण्यात आली. त्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूंकडून गोळीबार झाला आहे.


भारत-चीनदरम्यान अधिकृत सीमेची आखणी नाही, त्यामुळे सीमावाद सुरूच राहणार : वांग यी 


सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याआधी 29-30 ऑगस्टदरम्यान रात्रीही लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये ही झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. याआधी 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर चीनचंही मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या फ्लॅग मीटिंग सुरु आहे. मात्र त्यातच दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये झटापट झाल्याने तणाव पुन्हा वाढला आहे. दरम्यान झटापट झाल्याची अधिकृत माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. मात्र यामध्ये जीवितहानी झाली आहे का, किंवा कोणत्या प्रकारचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.