मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस जगभरात वाढत आहे. भारतात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जगभरात कोरोनावरील लसीचं संशोधन सुरु आहे. दरम्यान मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी याबाबत भारताची प्रशंसा केल आहे. बिल गेट्स यांनी केलेली स्तुती प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.


डिस्कव्हरी प्लसवर गुरुवार संध्याकाळी प्रीमियर होणारी डॉक्युमेन्ट्री 'COVID-19: India's War Against The Virus' मध्ये बिल गेट्स यांनी भारताची स्तुती केली आहे. बिल गेट्स यांनी म्हटलं की, भारताचा फार्मासिटिकल उद्योग केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी कोरोना लसीची उत्पादन करण्यास सक्षम आहे.


कोरोनावरील लसीचं संशोधन करण्यासाठी भारतीयांचा आत्मविश्वास वाढवण्य़ासाठी बिल गेट्स यांनी म्हटलं की, कोरोनावरील लसीचा शोध लावण्यासाठी भारतातील फार्मासिटिकल कंपन्या महत्त्वाचं योगदान देत आहेत. भारतात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अनेक लसी तयार केल्या जात आहेत. भारतातील फार्मासिटिकल कंपन्या केवळ भारतासाठीच नाही तर जगभरासाठी कोरोनावरील लसींचं उत्पादन करण्यास सक्षम आहेत आणि त्यामुळे आपण कोरोनाच्या महामारीतून मुक्त होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कोरोना व्हायरसचा भारतातील सद्यस्थितीचा विचार केला तर भारतात कोरोनाबाधितांची संख्या जवळपास 10 लाखांजवळ पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 9 लाख 68 हजार 876 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी 24 हजार 914 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 12 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात देशात 32 हजार 695 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 606 जणांचा मृत्यू झाला आहे.