India Overtake China in Population: जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन (China) नसून आपला भारत (India) देश आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच जागतिक तज्ञांनी 2023 मध्ये भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल असा अंदाज वर्तवला होता. आता युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA)च्या ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे.
युनायटेड नेशन्स (UNFPA)च्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या (Population) जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत-वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, चीनमधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्याने त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत आहे.
युनायटेड नेशन्सच्या संघटनेने जाहीर केली ताजी आकडेवारी
UNFPA चा 'द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023' हा '8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस' या शीर्षकाने प्रसिद्ध केला गेला आहे. यात नमूद केल्याप्रमाणे भारताची लोकसंख्या आता 1,428.6 दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष आहे. म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये 2.9 दशलक्ष इतका फरक आहे.
पहिल्यांदाच भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त
युनायटेड नेशन्सच्या लोकसंख्या आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त नोंदवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे तर 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युनायटेड नेशन्सची स्थापना झाली आणि 1950 पासून त्यांनी लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली. 1950 ते 2023 या कालावधीत युनायटेड नेशन्सने नोंदवलेल्या लोकसंख्येचा तक्ता पाहिला तर भारताची लोकसंख्या अशा प्रकारे वाढली-
- 2023 मध्ये भारताची लोकसंख्या 1,428,627,663 आहे, जी 2022 च्या तुलनेत 0.81% जास्त आहे.
- 2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1,417,173,173 होती, जी 2021 च्या तुलनेत 0.68% जास्त होती.
- 2021 मध्ये भारताची लोकसंख्या 1,407,563,842 होती, जी 2020 च्या तुलनेत 0.8% जास्त होती.
- 2020 मध्ये भारताची लोकसंख्या 1,396,387,127 होती, जी 2019 च्या तुलनेत 0.96% अधिक होती.
जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्याही भारतात
UNFPA अहवालात नमूद केल्याप्रमाणे, भारतातील 25% लोकसंख्या 0-14 वयोगटातील, 18% लोकसंख्या 10-19 वयोगटातील, 26% लोकसंख्या 10-24 वयोगटातील, 68% लोकसंख्येत 15-64 वर्षे वयोगटातील लोक आहेत आणि 65 वयोगटावरील 7% लोक आहेत.
चीनमधला जन्मदर कमी झाला असून वृद्धांची संख्या अधिक
दुसरीकडे, आपण चीनकडे पाहिल्यास, संबंधित आकडेवारी अनुक्रमे 17%, 12%, 18%, 69% आणि 14% अशी आहे. चीनमध्ये 65 वर्षांवरील लोकांची संख्या 20 कोटी, म्हणजेच वयोवृद्धांची संख्या चीनमध्ये भारतापेक्षा दुप्पट आहे. काही दशकांपूर्वी, चीन सरकारने 1 मूल धोरण लागू केले होते, सरकारच्या या धोरणामुळे लोकांनी मुलांना जन्म देणेच बंद केले होते.
चीन सरकारचे आटोकाट प्रयत्न सुरू, तरीही वाढत नाहीये लोकसंख्या!
आता चीनमध्ये परिस्थिती अशी आहे की सरकार म्हणते, दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना अनेक सुविधा दिल्या जातील. चीनमध्ये अनेक महाविद्यालयांनी तर अजब घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेप्रमाणे, तरुण मुला-मुलींनी किमान दिवस 'स्प्रिंग ब्रेक'म्हणजेच सुट्टीवर जावे, जेणेकरुन त्यांना प्रेमात पडण्यासाठी आणि घर बसवून मुलांना जन्म देण्यासाठी वेळ मिळेल.
या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी अशीही होती की, चीनची राजधानी आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर बीजिंगची लोकसंख्याही वाढण्याऐवजी कमी झाली आहे. कोरोनाचे संकट हे यामागचे एक प्रमुख कारण मानले जात आहे.