Imran Khan Arrest News : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये आता गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेसाठी पोलिस आल्यानंतर इम्रान खान यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यानंतर आता इम्रान खान यांना लाहोर उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पीटीआय समर्थक आणि पोलिसांमधील दिवसभर चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लाहोर उच्च न्यायालयाने पुढचा आदेश येईपर्यंत म्हणजे गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पोलिस कारवाईला स्थगिती दिली आहे.


मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी इम्रान खान यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापट झाली. अनेक तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना इम्रान खान यांना अटक करण्यात यश आलेले नाही. त्याचवेळी इम्रान खान यांना पुढचा आदेश येईपर्यंत अटक करु नयेत असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 


पाकिस्तानात आतापर्यंत काय घडले?


पोलिसांनी बुधवारी सकाळी जमान पार्कच्या बाहेर इम्रान खान यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु पीटीआय समर्थकांनी तो हाणून पाडला. पीटीआय समर्थकांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केली. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.


दुसरीकडे, लाहोरमध्ये पीटीआय समर्थकांनी पाण्याचा टँकर, मोटारसायकल आणि इतर वाहने जाळली. मॉल रोडवरील वॉर्डनच्या कार्यालयाचीही तोडफोड केली. सकाळी 10:30 वाजता चिलखती असलेली पोलिस व्हॅन पुन्हा एकदा इम्रान खान यांच्या निवासस्थानी पोहोचली.


सोमवारपासून पीटीआय कार्यकर्त्यांची इस्लामाबाद पोलिस, पंजाब पोलिस आणि नंतर रेंजर्सच्या कर्मचाऱ्यांशी झटापट सुरू होती. या चकमकींमध्ये आतापर्यंत सुमारे 30 पोलीस जखमी झाले आहेत, तर पीटीआयच्या किमान 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. परिसरातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही परिणाम झाला आहे.


आपली हत्या करण्याचा प्रयत्न, इम्रान खान यांचा आरोप


गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान बुधवारी इम्रान खान यांनी एकामागून एक अनेक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये इम्रान खान यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. त्यात म्हटलं आहे की, "मंगळवार सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर पोलिसांच्या हल्ल्यानंतर बुधवारी सकाळी अश्रूधुर, पाण्याच्या तोफा, रबर बुलेट आणि जिवंत गोळ्यांचा सामना करावा लागला. आता आमच्या समोर रेंजर्स आहेत. हे प्रकरण कोर्टात असताना देशद्रोही सरकार आपले अपहरण करून मारण्याचा प्रयत्न का करत आहे?"


हिंसाचार का झाला?


मंगळवारी संध्याकाळी इस्लामाबाद पोलीस इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर इम्रान खान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणाले होते की, पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले आहेत आणि त्यांना तुरुंगात टाकायचे आहे. मला काहीही झाले तरी हा देश इम्रान खानशिवायही संघर्ष करत राहील हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल असंही त्यांनी आपल्या समर्थकांना आवाहन केलं. 


इम्रान खान यांच्या या भाषणानंतर देशभरातील समर्थक रस्त्यावर उतरले आणि अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने केली. इस्लामाबादमध्ये या निदर्शनांनंतर किमान चार पोलीस जखमी झाले आणि दोन डझनहून अधिक पीटीआय समर्थकांना ताब्यात घेण्यात आले.


ही बातमी वाचा :