YouTube Channels Blocked : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार केल्याबद्दल IT नियम, 2021 अंतर्गत 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान-आधारित YouTube न्यूज चॅनेल्स ब्लॉक करण्यात आले आहेत. हे चॅनल्स चुकीची माहिती पसरवत होते, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. "राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि परदेशी राज्यांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंधाबाबत या चॅनेलमधून दाखवण्यात आलेली माहिती ही खोटी आणि संवेदनशील असल्याचे आढळून आले" असे निवेदनात म्हटले आहे.


कोणते चॅनल केले ब्लॉक?


लोकतंत्र टीव्ही, U&V TV, AM रझवी, गौरवशाली पवन मिथिलांचल, SeeTop5TH, सरकारी अपडेट, सब कुछ देखो. न्यूज की दुनिया हे पाकिस्तान आधारित चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे. सुमारे 85 लाख वापरकर्त्यांनी चॅनेलचे सबस्क्रिप्शन घेतले होते. याशिवाय एक फेसबुक अकाउंट आणि दोन फेसबुक पोस्ट ब्लॉक करण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2021 च्या आयटी नियमांनुसार कारवाई केली आहे. हे यूट्यूब चॅनल काही वृत्तवाहिन्यांचे लोगो आणि थंबनेल्सचाही गैरवापर करून प्रेक्षकांची दिशाभूल करत होते. 


डिसेंबरपासून आतापर्यंत यूट्यूबवरील 102 चॅनेल्स ब्लॉक


केंद्र सरकारकडून डिसेंबरपासून आतापर्यंत यूट्यूबवरील 102 चॅनेल आणि इतर अनेक सोशल मीडिया अकाऊंट्स ब्लॉक करण्यात आली आहेत. भारत सरकार एक प्रामाणिक, विश्वासार्ह आणि सुरक्षित ऑनलाइन वृत्त माध्यम वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तसेच भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी वचनबद्ध आहे," असे आदेशात म्हटले आहे.


भारताविरोधात अपप्रचार करणाऱ्या अशा वाहिन्यांवर कारवाई होणार


केंद्र सरकारने यापूर्वी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारात गुंतलेल्या पाकिस्तानमधील 4 यूट्यूब न्यूज चॅनेलसह 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत सांगितले की, हे चॅनेल्स तात्काळ प्रभावाने ब्लॉक करण्यात आल्या आहेत. भारताविरोधात अपप्रचार करणाऱ्या अशा वाहिन्यांवर पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या


WHO : मंकीपॉक्सची लस 100% प्रभावी नाही, लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक; WHO ने म्हटले..


Coronavirus Case : कोरोना पुन्हा वाढतोय; गेल्या 24 तासांत 12 हजारांहून अधिक रुग्ण, तर पॉझिटिव्हिटी दर 3.48 टक्क्यांवर


Jammu Kashmir : निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांना मतदानाचा अधिकार