Hyundai India : रविवारी एकीकडे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक व्यक्त करत असतानाच, एका ट्विटमुळे भारत आणि पाकिस्तान संघर्ष पुन्हा पेटला. दोन्ही देशांचे सोशल मीडिया यूजर्स एकमेकांवर हल्ले करत होते. आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईच्या पाकिस्तानी (Hyundai Pakistan) शाखेने ट्विटरवर केलेल्या ट्विटमुळे वाद सुरू झाला.


खरंतर, हा वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा पाकिस्तानमधील ह्युंदाई डीलरच्या ट्विटर अकाऊंट @hyundaiPakistanOfficial ने 'काश्मीर एकता' दिनाचे समर्थन करणारा संदेश पोस्ट करून काश्मीर फुटीरतावाद्यांचे समर्थन केले. या ट्विटनंतर भारतात ट्विटरवर बॉयकॉट ह्युंदाई (#BoycottHyundai) ट्रेंड होऊ लागला. मात्र, आता हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे. ह्युंदाई पाकिस्तानच्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ''चला आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाची आठवण ठेवूया आणि त्यांच्या समर्थनार्थ उभे राहूया ज्यामुळे त्यांचा स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवता येईल.''


भारतीय नेटकऱ्यांची जोरदार टीका
आंतरराष्‍ट्रीय कंपनी असल्‍याने ह्युंदाईच्‍या ट्विटवर काश्मीर संबंधित ट्विटमुळे गदारोळ झाला होता. भारतीय नेटकऱ्यांनी राजकीय भूमिका घेतल्याबद्दल ह्युंदाई पाकिस्तानला चांगलेच फटकारले. दुसरीकडे, भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून याबाबत माफी मागण्याची मागणी केली आहे. याबाबत कंपनीने माफी मागितली नाही, तर कंपनीला मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागेल, असा इशारा कपिल मिश्रा यांनी दिला आहे. तसेच, त्याच्या ब्रँड व्हॅल्यूला मोठा फटका बसेल.


ह्युंदाई इंडियाने दिले स्पष्टीकरण
यावर स्पष्टीकरण देताना ह्युंदाई इंडियाने (Hyundai Motors India) ने सोशल मीडियावर एक संदेश पोस्ट केला आहे. ज्यात भारतीय बाजारपेठेशी असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. यामध्ये, कंपनीने म्हटले आहे की, "ह्युंदाई इंडिया 25 वर्षांहून अधिक काळ भारतीय बाजारपेठेत वचनबद्धतेसह कार्यरत आहे आणि राष्ट्रवादाचा आदर करण्याच्या आपल्या मजबूत नीतिमत्तेवर ठाम आहे." याशिवाय Hyundai ने भारताचे दुसरे घर असे वर्णन केले आहे.



इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha