क्वाललांपूर: मलेशियन नौदलाच्या हवाई कवायती सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्स हवेत टक्कर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रॉयल मलेशियन नेव्ही (Malaysian Navy) सेलिब्रेशन सोहळ्याच्या तयारीसाठी हवाई कवायती सुरु असताना हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटना (Accident) घडली तेव्हा दोन्ही हेलिकॉप्टर्समध्ये (Helicopters) जवळपास 10 जण बसले होते. या सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. हे सर्वजण वैमानिक दलाचे सदस्य होते. 


मलेशियन नौदलाकडून याबाबत जाहीर केलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी मलेशियाच्या पश्चिम भागात असणाऱ्या पेराक येथील लुमूट या नौदलच्या तळावर हवाई कवायती (Air Show Rehershal) सुरु होत्या. या कवायतीदरम्यान हेलिकॉप्टर्स एकमेकांच्या अगदी जवळ होती. ही हेलिकॉप्टर्स दूर जात असताना दोन हेलिकॉप्टर्सची अचानक टक्कर झाली. ही टक्कर झाल्यानंतर हेलिकॉप्टर्सच्या पंख्याचा भाग तुटला आणि दोन्ही हेलिकॉप्टर्स जमिनीवर कोसळली. त्यामध्ये हेलिकॉप्टर्समध्ये बसलेल्या 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. या सगळ्यांचे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. त्यामुळे हे सर्व मृतदेह ओळख पटवण्यासाठी लुमुट येथील लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 


 



या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलेशियन नौदलाच्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी हेलिकॉप्टर्सच्या तुकडीकडून सराव सुरु होता. त्यावेळी HOM (M503-3) हेलिकॉप्टर फेनेक हेलिकॉप्टरच्या रोटरला जाऊन धडकले. या धडकेनंतर फेनेक हेलिकॉप्टर जवळच्या स्वीमिंग पूलमध्ये जाऊन कोसळले. तर HOM हे दुसरे हेलिकॉप्टर नौदलाच्या तळाजवळ असलेल्या मैदानात क्रॅश झाले. मलेशियन नौदलाकडून या दुर्घटनेची सध्या चौकशी सुरु आहे.


नौदलाच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता





या भीषण दुर्घटनेनंतर मलेशियन नौदलाच्या वर्धापनदिनाचा सोहळा रद्द होण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेनंतर मलेशियाचे संरक्षणमंत्री दातुक सेरी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर  न करण्याचे आवाहन केले आहे. तर मलेशियाचे राजे सुल्तान इब्राहिम यांनी मृत जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. 


आणखी वाचा


सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं